Nashik Crime News: लष्कराच्या तळापर्यंत नशेचा बाजार? नाशिकमध्ये लाखोंचे ड्रग्ज जप्त, तीन एजंटांना बेड्या
Nashik Crime News: देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅथे कॉलनी परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी सुमारे 24 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे.

Nashik Crime News: नाशिक शहरासह जिल्ह्यात मॅफड्रोन (MD) आणि गांजाच्या तस्करीने आधीच डोके वर काढले असताना, आता थेट लष्करी छावणीपर्यंत नशेचा विळखा पोहोचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक शहर पोलीस (Nashik Police) आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) संयुक्त कारवाई करत लष्करी छावणीच्या प्रवेशद्वारासमोरच लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून, या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅथे कॉलनी परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी सुमारे 24 लाख रुपये किमतीचे ‘अॅम्फेटामाइन’ तसेच गांजाचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा साठा लष्करी छावणीच्या मुख्य प्रवेशद्वारालगत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून लष्करातील काही व्यक्तींना ड्रग्ज पुरवठा होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
Nashik Crime News: तीन एजंटांना बेड्या
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील अंमलदार राजेंद्र गुंजाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मुन्ना कल्लु कोल (वय 40), शांती मुन्ना कोल (वय 33) आणि अमर मुन्ना कोल (वय 19, सर्व रा. सतना, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे तिघेही मजूर असून, गेल्या काही महिन्यांपासून देवळाली कॅम्प परिसरात वास्तव्यास होते.
Nashik Crime News: पहाटे छापा, ड्रग्जचा साठा उघड
गुरुवारी (दि. 8) पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास देवळाली कॅम्प पोलीस आणि एनडीपीएस पथकाने संशयितांच्या लेबर रूमवर छापा टाकला. या कारवाईत गांजा आणि ‘अॅम्फेटामाइन’ या अमली पदार्थांचा साठा आढळून आला. संशयितांनी पांढऱ्या रंगाच्या चौकोनी आकाराच्या कागदामध्ये ‘अॅम्फेटामाइन’ पदार्थ गुंडाळून ठेवला होता.
ही कारवाई देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Nashik Crime News: सापळा रचून कारवाई
लष्करी छावणीच्या प्रवेशद्वारासमोरच अमली पदार्थांचा साठा सापडल्याने पोलीस यंत्रणेसह लष्करी प्रशासनही सतर्क झाले आहे. लष्करी छावणी परिसरातील काही व्यक्तींना ड्रग्ज पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सैन्यातील काही अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती संकलित करत संशयितांवर पाळत ठेवली आणि योग्य वेळी सापळा रचून ही कारवाई केली. सुदैवाने, या नशेच्या व्यवहारातून लष्करात कोणताही गंभीर अनुचित प्रकार घडल्याची नोंद अद्याप नाही. मात्र, लष्करी यंत्रणांपर्यंत नशेचा विळखा पोहोचल्याची शक्यता निर्माण झाल्याने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात असून, पोलीस व लष्करी यंत्रणांनी संयुक्तपणे तपास अधिक कडक केला आहे. दरम्यान, अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, ड्रग्जचा पुरवठा नेमका कुठून होत होता, कोण-कोण यामध्ये सहभागी आहेत आणि लष्करातील कोणापर्यंत हे जाळे पोहोचले आहे, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आणखी वाचा























