अनैतिक संबंधाचा संशय, अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या नवऱ्याचा प्रियकरानं काटा काढला, नाशकात नेमकं काय घडलं?
प्रेयसीचा नवरा अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी प्रियकरानं थरारक कट रचल्याच समोर आलं आहे.

Nashik Crime: नाशिक शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गरवारे बस थांबा परिसरात घडलेल्या संतोष उर्फ छोटू काळे (वय 38, रा. लेखानगर) खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. दगडाने ठेचून झालेल्या या खुनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रेयसीचा नवरा अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी प्रियकरानं थरारक कट रचल्याच समोर आलं आहे. संतोष उर्फ छोटू काळे याचा निर्घृण खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमके प्रकरण काय?
शनिवारी सकाळी नाशिक-मुंबई महामार्गालगत गरवारे बस थांब्याजवळ संतोष काळे याचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून झालेल्या या खुनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असता संतोषची पत्नी पार्वती काळे (वय 30) हिचे प्रफुल्ल कांबळे (वय 36) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या नात्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. दोन दिवसांपूर्वीही संतोष व पार्वती यांच्यात टोकाचे भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यामुळे पतीचा कायमचा अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने पार्वती व प्रफुल्ल यांनी खुनाचा कट रचल्याचे उघड झाले आहे. या कटात योगेश बाळासाहेब जाधव (वय 23) आणि एका अल्पवयीन तरुणानेही साथ दिली. संतोष घरी परतला नाही, तेव्हा घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. डोक्यावर मोठ्या दगडाने हल्ला करून खून केल्याचे पोलिसांना दिसून आले.
तक्रारीनंतर तत्काळ कारवाई
या घटनेनंतर संतोषचे वडील अशोक काळे यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पार्वती काळे, तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे, योगेश जाधव तसेच एका अल्पवयीनाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पुढील तपासासाठी 17 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी इंदिरानगर पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे. खुनामागील अचूक कारण, नियोजन व त्यातील इतर तपशील शोधण्याचे काम सुरू आहे. घटनेत वापरलेले शस्त्र व इतर पुरावे जप्त करण्यात आले असून, पुढील चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.






















