Nashik Crime : घातपाताचा संशय असताना अपघाताची नोंद, तर दोन आठवडे उलटूनही व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा नाही; पोलिसांच्या तपासावर नाराजी
Nashik Crime : गंभीर गुन्ह्यांचाही उलगडा होत नसल्याने नाशिक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं आहे. विशेष म्हणजे गंभीर गुन्ह्यांचाही उलगडा होत नसल्याने पोलिसांच्या (Nashik Police) कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील दोन घटनांमुळे खळबळ उडालेली असतानाच एका घटनेच्या पोलीस तपासावरच संशय व्यक्त केला जात आहे. तर दुसऱ्या प्रकरणाचा 16 दिवस उलटून देखील अद्याप उलगडा झालेला नाही.
या दोन घटना कोणत्या आहेत हे जाणून घेऊया...
घातपाताचा संशय व्यक्त होत असताना पोलीस तपासात अपघाताची नोंद
30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी साठेआठच्या सुमारास नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी परिसरातील निर्मनुष्य आणि जिथे मोबाईलचीही रेंज गायब असते अशा दुर्गम भागातील मुख्य रस्त्यावर एक सँट्रो कार आगीत जळून खाक झाली होती. कारच्या नंबर प्लेटही दिसेनाशा झाल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरु करताच कारच्या ड्रायव्हिंग सीटवर जळालेल्या अवस्थेतील एक मानवी सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु करताच, एका अॅपमधून चेसीस नंबरच्या आधारे कार मालकाचा शोध घेण्यात आला. कारमध्ये आढळलेला एक चांदीचा दात आणि कंबरेच्या बेल्टच्या मेटलवरुन हा मृतदेह चांदवड तालुक्यातील नन्हावे गावचे माजी सैनिक संदीप गुंजाळ यांचा असल्याचं समोर आलं होतं. चार महिन्यांपूर्वी सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर सुरक्षारक्षक म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली होती आणि इथेच काही अंतरावरच ते तात्पुरते वास्तव्यासही होते. 29 ऑगस्टला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास संदीप हे साथीदारांसोबत कामाच्या ठिकाणावर होते. मात्र अचानक आपल्या सँट्रो कारने ते भरधाव वेगात इथून निघाले होते. कामाच्या ठिकाणावरुन साधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा प्रकार समोर आला होता. दरम्यान याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात असतानाच पोलीस तपासात हा एक अपघात असल्याचं समोर आल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
Nashik Crime : इगतपुरीत कारसह आढळला जळालेला अवस्थेत मृतदेह, डॉ. सुवर्णा वाझे प्रकरणाची पुनरावृत्ती?
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही व्यायसायिकाच्या हत्येचा उलगडा नाही
दुसरी एक घटना समोर आली होती ती नाशिकरोड परिसरात. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी शिरीष सोनवणे या नाशिकमधील एका प्रसिद्ध बेंच व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे जवळपास 115 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालेगाव तालुक्यात एका कालव्यामध्ये शरीरावर खुणा असलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात खून, खूनासाठी अपहरण करणे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि कट रचने या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नसून आरोपींचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.