Nashik Crime News : सोन्याचे मणी असल्याचे सांगत लोकांना गंडा; राजस्थानमधील तिघांना नाशिकमध्ये बेड्या
Nashik News : आम्हाला खोदकामात सोन्याची मणी असलेल्या माळा सापडल्यात, अशी बतावणी करत 16 सोन्याचे मणी असल्याचे भासवून लोकांना गंडा घालणाऱ्या राजस्थानच्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Nashik Crime News नाशिक : आम्हाला खोदकामात सोन्याची मणी असलेल्या माळा सापडल्यात, अशी बतावणी करत 16 सोन्याचे मणी असल्याचे भासवून लोकांना गंडा घालणाऱ्या राजस्थानच्या (Rajasthan) तीन जणांना पोलिसांनी (Nashik Police) ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गेल्या महिन्याभरापासून हे तिघेही आपल्या कबिल्यासह तवलीफाटा येथे रस्त्यालगत राहुट्या ठोकून वास्तव्यास होते. पोलिसांनी सापळा रचून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयितांकडून 1 लाख 62 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
खोदकामात सापडले सोन्याचे मणी
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन जण मुळ राजस्थानच्या सांचोर, जालोर आणि गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. संशयितांनी त्यांच्या साथीदारांसह नाशिक शहर व परिसरात फिरून जे सोने खरेदी करू शकतात, अशा व्यक्तींना त्यांनी खरे सोन्याचे दोन मणी दाखवले. त्यानंतर बनावट सोन्याचे मणी असलेल्या माळा खोदकामात सापडल्याचे सांगितले.
अनेक जणांना गंडविण्याचा प्रयत्न
दुकानदारांसह काही पादचारी महिला किंवा पुरुषांनाही ते अशाप्रकारे थांबवून गंडविण्याचा प्रयत्न करत होते. असाच एक प्रकार सातपूर एमआयडीसी भागात मोहित कोतकर यांच्यासोबत घडला. कोतकर यांना 22 ग्रॅम वजनाच्या बनावट सोन्याची मण्यांची माळ संशयितांनी दाखविली. त्यांचा विश्वास संपादन करून 20 हजार रुपयांना त्यांना एक माळ देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
माळ बनावट असल्याचे समजताच गाठले पोलीस ठाणे
कोतकर यांना नंतर ही माळ बनावट सोन्याची असल्याची लक्षात आली. त्यानंतर त्यांनी त्वरित गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. सोनवणे यांनी तातडीने याबाबत गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना माहिती दिली.
सीसीटीव्हीच्या आधारे पटली ओळख
मिळालेल्या माहितीनुसार ढमाळ यांनी सहायक निरिक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णू व उगले, रवींद्र बागुल यांचे पथक सज्ज करून घटनास्थळी रवाना केले. अंमलदार आप्पा पानवळ यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तींना तवली फाटा परिसरात ओळखले. त्यांनी त्वरित पथकाला याबाबत माहिती दिली. पथकाने पाठलाग करून तिघा दुचाकीस्वारांना ताब्यात घेतले.
1 लाख 62 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
या तीन संशयितांकडून 15 ते २० जुने मोबाइल, वेगवेगळे सीमकार्ड, सोन्याच्या मण्यांप्रमाणे भासणाऱ्या बनावट माळा, दुचाकी, वजनकाटा, रोकड, चांदीचे जुने नाणी, खऱ्या सोन्याचे दोन मणी, असा एकूण 1 लाख 62 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
आणखी वाचा