Nashik Bribe News : मुंबई CBI पथकाची नाशिकमध्ये मोठी कारवाई, वरिष्ठ विपणन अधिकारी लाच घेताना रंगेहाथ
Nashik Bribe News : केंद्र सरकारच्या कृषी व विपणन विभागाच्या एगमार्क कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास लाच घेताना मुंबईच्या सीबीआय पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.
नाशिक : मुंबईच्या (Mumbai) सीबीआय (CBI) पथकाने नाशिकमध्ये (Nashik Bribe News) मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) कृषी व विपणन विभागाच्या एगमार्क कार्यालयातील (Eggmark Office of Agriculture and Marketing Department) वरिष्ठ अधिकाऱ्यास एक लाखाची लाच (Bribe) घेताना सीबीआयने रंगेहाथ अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादकांना परवाना देणारे विपणन व तपासणी संचालनालय (एगमार्क) कार्यालय नाशिकरोड परिसरातील आनंदनगरमध्ये असून धुळे येथील डेअरी प्रॉडक्ट्स बनविणाऱ्या कंपनीने परवाना घेण्यासाठी या कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. यावेळी विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकर याने एक लाखाच्या लाचेची मागणी केली होती.
मुंबईच्या सीबीआय पथकाने रचला सापळा
याबाबत डेअरी प्रोडक्ट्स बनविणाऱ्या कंपनीने मुंबई सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर सोमवारी सीबीआय एसीबी मुंबईचे डीआयजी डॉ. सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 30 अधिकाऱ्यांच्या पथकाने नाशिक रोड येथील एगमार्क कार्यालयात सापळा रचला.
एगमार्कचा वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात
विशाल तळवडकरला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.सीबीआयने या प्रकरणी कार्यालयातील आणखी काही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तळवडकरने सहकारी कर्मचाऱ्यासाठी ही लाच स्वीकारल्याचे प्रथम चौकशीतून समोर आले आहे. सीबीआयच्या या कारवाईने केंद्रीय कृषी विभागात खळबळ उडाली आहे. लाचखोरास आज नाशिकच्या विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या