Nagpur Coronavirus News | नागपुरात माणुसकीला काळिमा; कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंची चोरी
नागपुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. मेयो रुग्णालयातील दोन वार्ड बॉय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंगावरील दागिने, मोबाईल, घड्याळ, इतर मौल्यवान वस्तू चोरायचे.
नागपूर : कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य माणूस चारही बाजूनी अडकून गेलेला असताना अनेक लोकं त्याच्या अगतिकतेचा फायदा उचलत लूट करत आहेत. नागपुरात तर माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेयो रुग्णालयातील दोन वार्ड बॉय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंगावरील दागिने, मोबाईल, घड्याळ, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू चोरायचे. गणेश डेकाटे आणि छत्रपाल सोनकुसरे असे या दोघांचे नाव असून ते स्पीक अॅण्ड स्पॅन या खाजगी कंपनीकडून मेयो रुग्णालयात वार्डबॉय म्हणून कार्यरत होते.
या कंपनीला मेयो रुग्णालयातील स्वच्छतेसह कोरोना बाधितांच्या मृतदेहांना रॅप करण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यांच्यावर बाधितांचे मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत रॅप करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, ते करताना दोघे मृतांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करायचे. गेल्या काही दिवसात मृत व्यक्तीच्या अंगावरून अंगठ्या, इतर दागिने, घड्याळ आणि खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. नुकतंच मेयो रुग्णालयात एका वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या खिशातील महागडा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी तहसील पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती.
पोलिसांनी त्यासंदर्भात सखोल तपास केल्यावर मृताच्या अंगावरून महागड्या वस्तू लंपास करणारे दुसरे कोणी नाही तर रुग्णालयातील दोघे वार्डबॉय असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना अटक करत विचारपूस केल्यावर दोघांनी आतापर्यंत अशाच पद्धतीने 5 चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी महागडे मोबाईल, घड्याळ, काही रोख रक्कम यांच्यासह कोरोना बाधितांचे काही इंजेक्शन, औषध आणि पीपीई किट असा एकूण 1 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आपण कोरोना वॉर्डात सेवा देत आहोत, लोकं आपल्याला कोविड योद्धा मानतात, त्यामुळे कोणीही आपल्यावर चोरी संदर्भात शंका घेणार नाही, आपले बिंग कधीच फुटणार नाही अशा आविर्भावात ते वागायचे.