Nagpur Crime : नागपुरात महिलेकडून 36 लाख रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त, जरीपटका पोलिसांची मोठी कारवाई
Nagpur Crime : नागपूरमध्ये एका महिलेकडून तब्बल 36 लाख रुपयाचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत मिसाळ लेआऊटमध्ये ही कारवाई करण्यात आली.
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एका महिलेकडून तब्बल 36 लाख रुपयाचं एमडी ड्रग्ज (MD Drugs) जप्त करण्यात आलं आहे. जरीपटका पोलीस स्टेशन (Jaripatka Police Station) अंतर्गत मिसाळ लेआऊटमध्ये ही कारवाई करण्यात आली. मिसाळ लेआऊट परिसरात भाड्याच्या घरात राहणारी एक महिला एमडी ड्रग्जची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 364 ग्रॅम (36 लाख 88 हजार रुपयांचे) एमडी ड्रग्स हस्तगत केलं आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
याबाबत जरीपटका पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रदीप किटे म्हणाले की, "जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक महिला एमडी ड्रग्जची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब टेकाडे यांना गुप्त माहितीदारांकडून मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. एनडीपीएस कायद्याअंतर्गत प्रक्रिया पूर्ण करत एमडी ड्रग्ज जप्त करण्याची मोठी कारवाई केली. यात 36 लाख 88 हजार 715 रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. या कारवाईत एमडी ड्रग्ज कमर्शिअल क्वॉन्टिटीत पकडण्यात आलं. 364.90 ग्रॅम एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. संबंधित महिला ही रेकॉर्डेड गुन्हेगार आहे. तिला अटक करण्यात आलं आहे. महिलेची पोलीस कोठडी आम्हाला मिळाली आहे. या प्रकरणात आणखी काही जण सहभागी आहेत का, याचा सध्या तपास सुरु आहे."
ही महिला आमच्या कोठडीत आहे. चौकशी सुरु आहे, जी काही माहिती मिळेल ती लवकरच सांगितली जाईल, असंही पीएसआय किटे यांनी पुढे सांगितलं.
अटकेतील महिलेची मोडस ऑपरेंडी
"संबंधित महिला ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार ते पाच दिवस एखादा रुम घेऊन राहत होती. तिथूनच ती आपलं काम करत होती, असं आतापर्यंतच्या तपासातून समोर आलं आहे.ती हा माल कुठून आणायची आणि कुठे विकायची हे अद्याप समजू शकलेलं नाही, त्याबाबत तपास सुरु आहे. सध्या ही महिला मिसाळ लेआऊट परिसरात घर भाड्याने घेऊन राहत होती," असं पोलीस उपनिरीक्षक प्रदीप किटे यांनी सांगितलं.
हेही वाचा