Nagpur Crime News : भरदिवसा कॅफे मालकाचे अपहरण करून मारहाण; मुलीशी बोलण्याचा वाद विकोपाला
Nagpur Crime News: नागपूर शहरात एका मुलीशी बोलण्याच्या क्षुल्लक कारणावरून आठ गुंडांनी चाकूच्या धाकावर एका कॅफे मालकाचे भर दिवसा अपहरण केले. त्यानंतर त्याला निर्जन जागी नेत बेदम मारहाण केली आहे.
Nagpur Crime नागपूर: उपराजधानी नागपूर शहरात (Nagpur Crime) अपराधांची मालिका सुरूच आहे. बघता बघता गुंडांवर कुणाचाच वचक राहिलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामागील कारण म्हणजे, सध्या सुरू असलेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अनेक हत्या आणि अपराधांच्या घटनांनी शहर हादरले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे (Nagpur Police) उभे ठाकले आहे. असे असताना नागपूर शहरात (Nagpur) आणखी एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीशी बोलण्याच्या क्षुल्लक कारणावरून आठ गुंडांनी चाकूच्या धाकावर एका कॅफे मालकाचे भर दिवसा अपहरण केले. त्यानंतर त्याला निर्जन जागी घेऊन जात बेदम मारहाण केली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भरदिवसा कॅफे मालकाचे अपहरण करून मारहाण
नागपूरच्या हिंगणा टी पॉईंट परिसरात संतोष नरेश जोगेकर (वय 25) यांचा कॅफे आहे. सोमवारच्या दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास संतोष कॅफेमध्ये असताना तीन तरुण आले. अगोदर त्यांनी बर्थडे पार्टीसाठी कॅफे हवा आहे अशी विचारणा केली आणि त्यानंतर त्यांच्यात बरीच चर्चा झाली. या चर्चे दरम्यान तोंडावर रुमाल बांधलेला एक तरुण तिथे आला. त्याने संतोषला विचारपूस सुरू केली. त्यानंतर त्यातील चौघांनीही शिवीगाळ करत अचानक संतोषला मारहाण सुरू केली. यावर प्रतिकार करत संतोषने देखील स्वत:चा बचाव केला असता, त्यातील एकाने खिशातून चाकू काढत त्या धाकावर संतोषला फरपटत कॅफेबाहेर आणले. दरम्यान परिसरात देखील गर्दी जमली. मात्र त्याच्या हातात चाकू असल्याने इतर कुणी वाचवायला समोर आले नाही. मारामारीच्या दरम्यान यातील एकाच्या तोंडांवरील रुमाल खाली पडला असता तो हर्षल ब्राह्मणे (वय 25, रा. दाते ले आऊट) असल्याचे संतोषने ओळखले.
मारेकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
या हल्यात हर्षलसोबत आणखी पाच साथीदार बाहेर उभे होते. त्यानंतर मारेकऱ्यांनी संतोषला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसविले आणि अजनी रेल्वे कॉलनीजवळील मैदानावर नेले. तेथे एका मुलीला किती वेळा भेटलास, अशी विचारणा हर्षलने केली. यानंतरही हर्षलने संतोषला जबर मारहाण केली. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास दोन मारेकऱ्यांनी त्यांच्या मोटारसायकलवरून संतोषला त्याच्या कॅफेजवळ सोडले. यासर्व मारहाणीच्या प्रकारामुळे संतोष प्रचंड दहशत मध्ये असून तो गंभीर जखमी देखील झाला होता. त्यानंतर त्याने धाडस करत राणाप्रतापनगर पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि मारेकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी हर्षल आणि त्याच्या सात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या