Nagpur Crime : नागपूरच्या काटोलमध्ये 12 वर्षीय मुलाकडून 27 वर्षीय तरुणाची हत्या
Nagpur Crime : नागपुरात गुन्हेगारी आता धोक्याच्या वळणावर जात आहे का? नागपुरात आता लहान मुलंही गुन्ह्यात ओढले जात आहेत का? असे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे काटोलमध्ये घडलेली एक घटना.
नागपूर : नागपुरातील गुन्हेगारी नेहमीच चर्चेत असते. मात्र, नागपुरात गुन्हेगारी आता धोक्याच्या वळणावर जात आहे का? नागपुरात आता लहानगे ही गुन्ह्यात ओढले जात आहेत का? असे प्रश्न विचारण्याचा कारण म्हणजे नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये घडलेली एक घटना. काटोलमध्ये दोन दिवसांपूर्वी डीजेच्या तालावर नाचताना दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि त्याचे रुपांतर एका 12 वर्षीय मुलाकडून 27 वर्षीय तरुणाच्या खुनामध्ये झाले. पोलिसांनी 12 वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेत बाल सुधारगृहात पाठवलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये अण्णाभाऊ साठेनगरात 28 एप्रिलच्या रात्री एक लग्न समारंभ होता. त्या ठिकाणी डीजे लावण्यात आला होता. परिसरातील काही तरुण आणि लहान मुले डीजेच्या तलवार बेधुंद नाचत होते. यावेळी एका 12 वर्षीय मुलाचा धक्का लागल्याने राहुल गायकवाड नावाच्या तरुणासोबत त्याचा वाद झाला. आधी शाब्दिक वाद झाला, नंतर हाणामारीला सुरुवात झाली. राहुल गायकवाडने रागात 12 वर्षीय मुलाला मारहाण केली. सर्वांच्या समोर मारहाण झाल्यामुळे चिडलेल्या 12 वर्षीय मुलाने स्वतःच्या कपड्यात लपवलेला चाकू बाहेर काढून राहुल गायकवाडच्या छातीत सपासप वार केले.
लग्नघराच्यासमोर अशी घटना घडल्याने एकाच खळबळ माजली. 12 वर्षीय मुलगा आपलं काय बिघडवू शकेल, अशा विचाराने बेसावध असलेला राहुल गायकवाड अचानक चाकू हल्ला झाल्याने गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या राहुलला आधी काटोलच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने राहुल नागपुरातील मेयो शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी काल (29 एप्रिल) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी आयपीसीच्या कलाम 326 अन्वये गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंदवला होता. मात्र, राहुल गायकवाडचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणात आयपीसी 302 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. काटोल पोलिसांनी 12 वर्षीय मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवलं आहे.
जुना वाद कारणीभूत
काटोल पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हत्या झालेला राहुल गायकवाड आणि हत्या करणारा 12 वर्षीय मुलगा काटोलमधील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात राहतात. दोघांचं घरही जवळ जवळ आहेत. यापूर्वी दोघांचा अनेक वेळेला वाद व्हायचे. लग्नात नाचताना सुरु झालेले वाद विकोपाला गेला आणि त्याचं रुपांतर हत्येच्या घटनेत झालं.
नागपुरात अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांची नवी डोकेदुखी
नागपुरात हत्येच्या घटना नवीन नाहीत. मात्र, गेल्या काही काळापासून किंबहुना काही वर्षांपासून नागपुरात गुन्हेगारीचा एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. तो म्हणजे गंभीर गुन्ह्यात मोठ्या गुन्हेगारांऐवजी अल्पवयीन गुन्हेगारांचे सहभाग वाढले आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील हत्येच्या अनेक प्रकरणात 16 ते 20 वर्ष वयातील गुन्हेगार सहभागी असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे नागपुरात कोवळ्या वयातील मुलं मोठ्या गुन्हेगारांच्या खोट्या बडेजावाला बळी पळून गुन्हे जगतातील आभासी ग्लॅमरकडे आकर्षित होत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच मोठे गुन्हेगार स्वतः गुन्हे न करता कोवळ्या वयातील मुलांना गुन्ह्यात ओढून त्यांच्या हस्ते गंभीर गुन्हे घडवून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा डाव खेळत आहेत का, असा प्रश्नही नागपुरात गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढत सहभाग पाहून निर्माण होत आहे.