धक्कादायक! मुंबईत 13 वर्षीय मुलीवर शाळेतच सामूहिक अत्याचार; 2 अल्पवयीन आरोपी ताब्यात, दोघांनी पहारा दिल्याचंही समोर
एका 13 वर्षीय मुलीवर शाळेमध्ये सामूहिक बलात्कार (Mumbai Gang Rape) झाला असल्याची संतापजनक घटना घडली आहे.
Mumbai Rape Case: महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईमध्येही (Mumbai News) अशा घटनांचं प्रमाण वाढीस लागलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा उघडकीस आली आहे. एका 13 वर्षीय मुलीवर शाळेमध्ये सामूहिक बलात्कार (Mumbai Gang Rape) झाला असल्याची संतापजनक घटना घडली आहे. माटुंग्यातील एका शाळेत ही खळबळजनक घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी वर्गातीलच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.
मुंबईतील माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शाळेत वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळं सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या हॉलमध्ये येण्यास सांगितले होते. त्याच दरम्यान इयत्ता आठवीच्या एका मुलीला वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी अडवलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
यावेळी त्यांचे 2 साथीदार वर्गाबाहेर पहारा देत होते, असंही समोर आलं आहे. ही घटना मंगळवारी घडल्याचे समोर आलं आहे.सदर पीडित मुलीने पोटदुखीची तक्रार केल्यानंतर तिच्या आईला याबाबत माहिती मिळाली. यानंतर पीडित मुलीच्या आईनं पोलिसांत एफआयआर दाखल केला.
दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं
सध्या मिळालेल्या माहितीनुसार, आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 376 (डी) अंतर्गत 2 मुलांविरुद्ध गुन्हा नोंदवून दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या या दोघांना डोंगरी सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच शाळेतील विद्यार्थी आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहारेकरी असलेल्या उर्वरित दोन मुलांची चौकशी सुरू असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितलं की, या घटनेनंतर पीडित तरुणी खूप घाबरली आहे. तिनं धाडस करून शाळेतून घरी आल्यानंतर आईवडिलांना याबाबत माहिती दिली. ही घटना ऐकून आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पीडितेच्या पालकांनी तात्काळ पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर तातडीनं पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं.
ही बातमी देखील नक्की वाचा