(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जन आशीर्वाद यात्रेत खिसेकापू चोरांचा कहर, कार्यकर्त्यांचे खिसे कापणाऱ्या टोळीला अटक
"जन आशीर्वाद" यात्रेत तुफान गर्दी झाल्याने सराईत पाकिटमारांच्या नाशिक-मालेगाव येथून आलेल्या टोळीने यात्रेत 10 मोबाईल चोरण्यात आले. तर 1 लाख 19 हजाराच्या रोकडीवरही हातसफाई केली
ठाणे : ठाणे जिल्ह्याला केंद्रीय मंत्री पद दिल्याच्या उत्साहात केंद्रीय मंत्र्यांनी काढलेल्या "जन आशीर्वाद" यात्रेत तुफान गर्दी झाल्याने सराईत पाकिटमारांच्या नाशिक-मालेगाव येथून आलेल्या टोळीने यात्रेत 10 मोबाईल चोरण्यात आले. तर 1 लाख 19 हजाराच्या रोकडीवरही हातसफाई केली. यामुळे ठाण्यात खळबळ उडाली होती.
यासंदर्भात काही गुन्हे कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाने केला आणि चार जणांच्या सराईत चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखोंच्या रोकडीसह 10 मोबाईल असा 6 लाख 69 हजाराचा मुद्देमाल आणि एक मारुती सुझुकी कार हस्तगत केली आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या "जन आशीर्वाद यात्रेत" हातसफाई करून खळबळ उडवून देणारे संशयित आरोपी पनवेल शिळफाटा येथील कल्पवृक्ष हॉटेल जवळ असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना खबऱ्याने दिली. त्यानुसार घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने सापळा रचला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पोलिस पथकाने संशयित आरोपीना जेररबंद करून त्यांच्याकडून मुद्देमाल आणि मारुती सुझुकी कार जप्त केली.
अटक आरोपी अबूबकर उर्फ अबू कबुतर मोहम्मद उस्मान अन्सारी(35) ,आरोपी नदीत अक्तर फैयाज अन्सारी (30), आरोपी अतिक अहमद मोहम्मद स्वराती अन्सारी (51) आणि आरोपी अशपाक अहमद अन्सारी(38) यांचा समावेश आहे. पोलीस पथकाने अटक आरोपींकडून अधिक चौकशी केली असता, यात्रेत त्यांनी नागरिकांचे खिसे कापल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलीस पथकाने 1 लाख 19 हजाराची रोकड आणि 10 मोबाईल फोन आणि एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची सेलेरिओ चारचाकी गाडी, खिसे कापण्यासाठी कटर असा एकूण 6 लाख 69 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :