Lalbaughcha Raja: 'लालबाग राजा'च्या मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांकडे तक्रारी करण्यासाठी भक्तांच्या रांगा
Lalbaughcha Raja: लालबागच्या मिरवणुकीत चोरट्यांना अनेक भाविकांचे मोबाईल, पाकीट लंपास केले आहेत. त्यामुळे चोरी झालेल्या भक्तांनी चोरीची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले आहे.
मुंबई : लालबाग राजाच्या (Lalbaughcha Raja) मिरवणुकीला (Visarjan 2022) काही समाजकंटकांकडून गालबोट लागलं आहे. बाप्पाचं शेवटचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांच्या पाकिटांवर, मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे पोलिसांकडे तक्रारी करण्यासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
लालबागच्या राजाचं दर्शन न घेता आलेले भाविक दर्शनासाठी विसर्जन मिरवणुकीत बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मिरवणुकीच्या मार्गावर दाखल होतात. या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. लालबागच्या राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या गर्दीतील अनेक मोबाईल, सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र लंपास केले. या टोळीने सुमारे 50 मोबाईल फोन आणि वेगवेगळ्या सोनसाखळ्या लुटल्या आहेत. या चोरीची फिर्याद देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात रांग लागली आहे. मोबाईल हरवल्याची तक्रार आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात पोलीस व्यस्त आहेत. तक्रारीसाठीही भाविकांना तासंतास रांगेत उभं राहावं लागत आहे.
लालबागचा राजा गणपती परिसरातून वळत असताना मोठी गर्दी जमली आणि चोरीचा फायदा घेऊन चोरीची घटना दुपारी 1 ते 1:30 च्या दरम्यान घडल्याचे बहुतांश नागरिकांनी सांगितले. काळाचौकी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी झारखंडमधून गणेशोत्सवादरम्यान मोबाईल चोरी करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना अटक केली होती. चोरट्यांना अनेक भाविकांचे मोबाईल, पाकीट लंपास केले आहेत. त्यामुळे चोरी झालेल्या भक्तांनी चोरीची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. मात्र चोरीची तक्रार करण्यासाठी मोठी गर्दी पोलीस स्टेशन बाहेर लागली आहे. विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर चोरीचं संकट ओढावलं आहे.
चिमुरड्याला सुखरूप पालकांकडे सोपवले
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत एक चिमुरडा हरवला होता. पोलिसांनी सातत्याने अनाऊसमेंट केल्यानंतर त्याचे वडील दोन तासांनंतर त्याला घ्यायला आले आणि चिमुरड्याला सुखरूप आपल्या पालकांकडे सोपवण्यात आले.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...
गेले दहा दिवस संपूर्ण राज्यभर एकच जयघोष होता तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया.. मात्र आज गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्याची वेळ आली आहे. कारण आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा आज गावाला परतणार आहे. मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे.. ढोलताशांचा गजर.... त्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त.... गुलालांची उधळण.... बाप्पावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी..... मुंबईच्या लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत दिसणारं हे दृश्य दोन वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळत आहे..