(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai NCB : तब्बल 286 किलो उच्च प्रतीचा गांजा जप्त; मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, दोघे जेरबंद
NCB मुंबईने सोलापूर-मुंबई महामार्गावर 286 किलो गांजा जप्त केला आहे. अंदाजे 3.5 कोटी रुपए किमतीचा हा उच्च दर्जाचा गांजा जप्त केला आहे.
NCB Action in Mumbai : मुंबई एनसीबीनं मोठी कारवाई करत तब्बल 286 किलो गांजा जप्त केला आहे. आंतरराज्यीय अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटवर कारवाई करताना NCB मुंबईने सोलापूर-मुंबई महामार्गावर 286 किलो गांजा जप्त केला आहे. अंदाजे 3.5 कोटी रुपए किमतीचा हा उच्च दर्जाचा गांजा जप्त केला आहे.
प्राथमिक तपासात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणासह विविध राज्यांमध्ये पसरलेल्या आंतरराज्यीय ड्रग सिंडिकेटचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. हे सिंडिकेट मुंबईतील किमान 20 वेगवेगळ्या ड्रग्ज तस्कर गटांना मोठ्या प्रमाणात गांजाचा पुरवठा करत असे समजले आहे. हे गट ग्राहकांना कमी प्रमाणात गांजा पुरवत असल्याची माहिती आहे. तसेच ते उच्च दर्जाचा गांजा थेट आंध्रप्रदेश, तेलंगणामधील सोर्सकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करत आणि मुंबईतील रस्त्यावरील पेडलर्सच्या गटांना पुरवायचे, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे.
मुंबई एनसीबीला अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटबाबत माहिती मिळाली होती. मुंबई शहरात अमली पदार्थांची मोठी खेप येणार असल्याची माहिती त्यांना गुप्त सूत्रांकडून मिळाली होती. यानंतर एनसीबीच्या टीमनं 26 जूनच्या रात्री आणि 27 जूनच्या पहाटे फील्ड ऑपरेशन राबवलं.
एनसीबीच्या टीमनं दोन दिवस सोलापूर-मुंबई महामार्गावर सापळा रचला. यावेळी त्यांना दोन प्रवासी असलेले एक संशयास्पद वाहन आढळून आले. त्यांनी या वाहनाला थांबवत तपासणी केली. तपासणीत कारमध्ये तपकिरी रंगाच्या चिकट टेपची 95 पाकिटे लपवून ठेवल्याचे आढळून आले.
या पॅकेट्समध्ये उच्च दर्जाचा गांजा ठेवण्यात आला होता. या पाकिटांमध्ये एकूण 286 किलो गांजा आढळून आला असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे, असं अमित घावटे, झोनल डायरेक्टर एनसीबी मुंबई यांनी सांगितलं आहे.
गांजा जप्तीची ही अलीकडच्या काळातील मोठी कारवाई मानली जात आहे. यासंदर्भात एनसीबी सखोल चौकशी करत आहे.