Mumbai Crime : दिल्लीतील चोरांचा मुंबईतील बंद घरांवर डोळा! चोरीसाठी विमानाने यायचे, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Mumbai Crime News Update: आंतरराज्य टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चोरी करण्यासाठी दिल्लीवरुन विमानाने मुंबईला येत होते.
Mumbai Latest Marathi Crime News Update: मुंबईत दिवसाढवळ्या घरफोडया करून राजधानी एक्सप्रेसने परराज्यात पलायन करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद करण्यात मुंबईच्या मालाड पोलिसांना यश मिळाले आहे. दिल्लीत 100 हून अधिक गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या आणि तीस वर्षाहून अधिक काळ दिल्लीत धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीला मुंबई मालाड पोलीसांनी मात्र पहिल्याच प्रयत्नात अटक केली आहे. हे चोर मुंबईत चोरी करण्यासाठी विमानाने आले होते, चोरी करून यातील दोन चोर पुन्हा विमानाने गेले. मात्र मुद्देमाल घेऊन जाणाऱ्या तीन चोरांना मालाड पोलिसांनी मध्य प्रदेश रतलाम येथून अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 1.7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पोलीस ठाणे हद्दीत लिबर्टी गार्डन येथील एका तीन मजली इमारतीमध्ये दिवसाढवळ्या एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी केली. घरातील कपाटात ठेवलेले रोख रुपये, लॅपटॉप तसेच सोन्या चांदीचे दागीने अशी एकूण रुपये 1,87,500 रुपयांची मालमत्ता अज्ञात इसमांनी चोरून नेलेबाबत 11 जानेवारी रोजी फिर्यादीने मालाड पोलीस ठाण्यास तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर मालाड पोलिसांनी तपासासाठी पथके तयार करून तपासात सुरुवात केला.
ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी कसलाही पुरावा न ठेवल्याने आणि परिसरात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने चोरांची माहिती मिळवणे कठीण झाले होते. मात्र गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरी झालेल्या परिसरातील खाजगी व सरकारी असे मिळून एकूण 70 ते 80 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली. संशयित आरोपी कुर्ला परिसरातील एका लॉजवर थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. मात्र त्या अगोदरच तिथून निघून गेल्याचे समजल्यानंतर पोलीस पथकाने मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला. मात्र चोर तेथेही आढळून आले नाहीत, मात्र प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी राजधानी एक्सप्रेस गाडीने निघून गेल्याचे समजले. यानंतर मालाड पोलिसांनी एक्सप्रेसमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या रेल्वे कर्मचान्यांशी संपर्क साधून त्यांना आरोपींचे छायाचित्र पुरवून तीन आरोपींना रतलाम, मध्यप्रदेश येथे रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल यांच्या मदतीने ताब्यात घेतले.
मालाड पोलीस ठाण्याचे पथकाने तीन आरोपींना रतलाम येथे ताब्यात घेतले. अटक आरोपीकडे चौकशी केल्यावर त्यांच्या दोन साथीदारांनी हवाईमार्गे पलायन केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी मुंबई शहर, ठाणे व आजुबाजुच्या जिल्हयांमध्ये देखील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडुन लोखंडी कटावणी, पक्कड, कटर, स्कु ड्रायवर, चाव्यांचा जुडगा अशी घरफोडीची हत्यारे तसेच विविध ठिकाणाहून चोरी केलेले सोन्या चांदीचे दागीने, लॅपटॉप, मोबाईल तसेच महागडी घडयाळे अशा प्रकारची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
निजाम निसार शेख (46 वर्ष), अक्सर समाहून शेख (28 वर्ष) अन्चर समाहून शेख (38 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची आहेत. हे तिघेही आरोपी हे दिवसाढवळ्या घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये दिवसा घरफोडीचे जवळपास 100 गुन्हे नोंद आहेत. मालाड पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगीरीमुळे मुंबई व आजुबाजुच्या जिल्हयांत एकाच आठवडयात घडलेले एकुण 07 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्यांनी मुंबई गुजरात, दिल्ली या राज्यांमध्ये देखील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.