(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, वृध्द नागरिकाला लुटणारी टोळी गजाआड, मुंबई पोलिसांची धडक कारवाई
Mumbai Crime News : वृध्द नागरिकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. खार पोलिसांनी केअर टेकर सह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
Mumbai Crime News Update : मुंबईच्या खार (Mumbai khar) पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खार परिसरात घरात एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांना अश्लील व्हिडिओ व्हायरल (Viral Video) करण्याची धमकी देत लाखो रुपये खंडणी मागणाऱ्या चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना (Mumbai khar Police) यश मिळाले आहे. खार पोलिसांनी याप्रकरणी केअर टेकर (Care Taker) मुलगी आणि तिच्या इतर साथीदारांना अटक केली आहे. नीतू (20 वर्षे), अनिल चौहान (32), किरण नायर (24) आणि राजेश केवट (34) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या हे चारही आरोपी खार पोलिसांच्या ताब्यात असून या चौघांनी अशा प्रकारे इतर काही वृद्ध नागरिकांना फसवले आहे का? याबाबत अधिक तपास करत आहेत.
खार परिसरात घरात एकटेच राहणाऱ्या विपीन शेठ यांनी आठ दिवसापूर्वी आपली देखभाल करण्यासाठी एक केअर टेकर मुलीची एजन्सी मार्फत नेमणूक केली. मात्र या मुलीच्या वर्तवणुकीचा संशय आल्याने आठ दिवसानंतर विपीन शेठ यांनी त्या मुलीला आठ दिवसांचा पगार आणि अधिकचे पाचशे रुपये देऊन उद्यापासून कामावर येऊ नको असे सांगितले. पगार घेऊन गेल्यानंतर केअर टेकर मुलीने दुसऱ्या दिवशी फोन करून तुमचा अश्लील व्हिडिओ माझ्याकडे आहे. तुम्ही जर मला तीस हजार रुपये दिले नाहीत तर तो व्हिडिओ मी व्हायरल करेन, असे सांगितले. यावर तू माझ्या मुलीसारखी आहेस असे अनाप-सनाफ काय बोलतेस? असे फिर्यादी सेठ यांनी त्या केअर टेकर मुलीला म्हटले. यावर पुन्हा त्या मुलीला कामावर ठेवणाऱ्या एजंटने फोन करून सेठ यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली.
मात्र त्यांची ही चाल ध्यानात येताच सेठ यांनी खार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. याप्रकरणी खार पोलिसांनी कलम 385, 34 भादवि नुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन खार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचून केअरटेकर नीतू आणि एजंट यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला व या गुन्ह्यात अजून दोन जणांचा देखील समावेश असल्याचे उघडकीस आले. यानंतर त्या दोघांनाही खार परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
सध्या वृद्ध नागरिकांना धमकावून खंडणी मागितल्या प्रकरणी चारही जण खार पोलिसांच्या ताब्यात आहेत. या आरोपींनी अशाच प्रकारे इतर काही एकटे राहणाऱ्या वृद्धा नागरिकांना फसवले आहे का? याबाबतचा अधिकचा तपास खार पोलीस करत आहेत. खार पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.