मर्चंट नेव्हीत नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक! तीन जणांना ठोकल्या बेड्या
तीन सराईत आरोपीना साकीनाका पोलीसांनी दिल्लीमधून अटक केली आहे. आरोपींनी बेरोजगार तरुणांकडून 43 लाखापेक्षा अधिक रक्कम लुटली
Mumbai Crime News : सध्या मुंबईसह देशभरात बेरोजगार तरुण तरुणींची संख्या वाढलेली आहे. अनेक तरुण-तरुणी नोकरी मिळवण्यासाठी पैसे देण्यास तयारही असतात. याच परिस्थितीचा फायदा घेत काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांची फसवणूक होत असते. अशाच एका गुन्ह्याची उकल करण्यात मुंबईच्या साकीनाका पोलिसांना यश आले आहे. मर्चंट नेव्हीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली सराईत गुन्हेगारांनी शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून 64 हून अधिक पासपोर्ट आणि सी.डी.सी जमा करण्यात आले आहेत.
शिवकुमार राजेशकुमार गुप्ता (29 वर्षे), उदीत कमल सिंग (24 वर्षे) आणि सिद्धार्थ कमल बाजपेयी (22 वर्षे) अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. साकीनाका पोलिसांना या तीनही आरोपींना नोएडा येथून अटक करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील साकीनाका परिसरात मर्चन्ट नेव्हीत नोकरी मिळवून देण्यासाठी जानेवारी 2023 मध्ये अग्याता मरिन्स अलाईस शिपमेन्ट नावाने कार्यालये उघडले. यासंबंधीची जाहिरात देखील त्यांनी वृत्तपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती, यानंतर सुशिक्षित मात्र बेरोजगार असलेल्या अनेक तरुणांनी या कार्यालयात नोकरीसाठी अर्ज केले. या सर्व इच्छुक उमेदवारांकडून नोकरी मिळवून देण्यासाठी रोख रक्कम देखील स्वीकारली तसेच अनेक तरुणांचे पासपोर्ट देखील जमा करून घेतले होते. मात्र कालांतराने हे कार्यालय बंद करून तेथील कर्मचारी प्रसार झाले होते. या बेरोजगार तरुणांची घोर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणांनी साकीनाका पोलिसांशी संपर्क साधून या विरोधात तक्रार दिली.
साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी कलम 420 आणि 34 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात सुरुवात केली. पोलिसांनी फरार आरोपींचे लोकेशन तपासले असता ते दिल्ली नोएडा परिसरात असल्याचे समजले यानंतर साकीनाका पोलिसांनी यात तीन फरार आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. सध्या हे तीनही आरोपी साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या इतरही साथीदारांचा आता पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी या सर्वांची खाती फ्रीज केली असून या तीन आरोपींकडून 127 बेरोजगार तरुणांचे पासपोर्ट आणि सी डी सी ताब्यात घेतले आहे.
हे सर्व आरोपी मुंबईसह राज्य आणि राज्याच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी आपला कार्यालय उघडून त्यामध्ये बेरोजगार तरुणांना मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी देण्याचे नावाने फसवून करून तेथून पडून जात होते. सध्या साकीनाका पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.