Mumbai Crime: वृद्धाचा खून करून घरात चोरी करणाऱ्या केअर टेकरला अटक, घटनेच्या 12 तासांत अहमदाबादमधून घेतलं ताब्यात
Santacruz Murder: मुंबईच्या सांताक्रुझ भागामध्ये राहणाऱ्या वृद्धाची केअर टेकरने हत्या केली आणि काही वस्तूंची चोरी करुन तो फरार झाला. पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपीला अहमदाबादमधून अटक केली आहे.
Mumbai News: सांताक्रुझमधील वृद्धाच्या हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत आरोपी केअर टेकरला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक केली आहे. मुंबईच्या सांताक्रुझ भागामध्ये (Mumbai Crime News) एका 85 वर्षाच्या वृद्ध माणसाची त्याच्या घरात काम करणाऱ्या केअर टेकरने हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (8 मे) घडली होती. कृष्णा मनबहादूर पेरियार (30 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या केअर टेकर नोकराचं नाव आहे. हेल्थ केअर अॅट होम (Health Care At Home) या प्लेसमेंट एजन्सीकडून नाईक दांपत्याने त्याला देखरेख करण्यासाठी नेमले होते. आठच दिवसापूर्वी हा नोकर म्हणून नाईक यांच्या घरी कामावर रुजू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (8 मे) आरोपीने डॉ. मुरलीधर पुरुषोत्तम नाईक यांच्या तोंडावर सेलोटेप लावून, तोंड बंद करून दोन्ही हात पाठीमागे बांधून ठेवत त्यांची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपी केअर टेकरने नाईक यांच्या गळ्यातील अंदाजे 20 ग्रॅम वजनाची सोन्याची आणि रूद्राक्षाची मिक्स माळ काढून घेतली आणि तो फरार झाला. या संदर्भात संगीता गर्ग या महिलेने सांताक्रुझ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. सांताक्रुझ पोलिसांनी यासंदर्भात हत्येचा गुन्हा दाखल करून तपासासाठी 10 टिम तयार करून तपासाला सुरुवात केली.
अपर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची विविध पथके आरोपीला शोधण्याच्या कामाला लागली. आरोपी केअर टेकरने त्याचा मोबाईल फोन बंद केला होता. आरोपीच्या राहण्याचाही निश्चित ठावठिकाणा नसताना प्राप्त माहितीच्या आधारे आणि तांत्रिक तपासामध्ये आरोपीने बोरीवली येथून सौराष्ट्र एक्सप्रेस ही ट्रेन पकडली असल्याचे समजले. खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यानंतर अहमदाबादच्या जीआरपीएफ पथकाच्या सहाय्याने 12 तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली.
अटक आरोपी केअर टेकरने मालकाच्या गळ्यातली सोन्याची चेन आणि हातातील घड्याळ चोरी करण्यासाठी मालकाची हत्या केलाचे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले. या प्रकरणानंतर महानगरांमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कोण आहे केअर टेकर?
- कृष्णा मनबहादूर पेरियार (30 वर्ष) असे या आरोपी केअर टेकरचे नाव होते .
- आरोपी केअर टेकर कृष्णा याची 1 मे म्हणजे आठ दिवस अगोदर नियुक्ती करण्यात आली होती.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केअर टेकर हा गेल्या आठ दिवसांपासून खाली उतरलाच नव्हता.
- मध्यरात्री ही हत्या केल्यानंतर आरोपी कृष्णा हा फरार झाला होता.
हेही वाचा: