Mumbai Crime : मद्यधुंद चालकाची मुजोरी, पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
Mumbai Crime News : मद्यधुंद वाहन चालकास अंधेरी पोलिसांनी केली अटक केली असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली.
मुंबई : दारूच्या नशेत असलेल्या एका कार चालकाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. शिवाय पळून जाताना बॅरिकेड्स तोडून 2-3 गाड्यांचे नुकसान देखील केले. अंधेरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी 32 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. सभ्यसाची निशांक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार पोलीस हवालदार जयवंत मोरे हे सहार वाहतूक विभागात कार्यरत असून ते गोखले पुलाजवळ तपासणी करत होते. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची होंडा कार आली. त्या गाडीच्या ड्रायव्हरने रस्त्यावर वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांचे न ऐकता बॅरिकेट्सही तोडले. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सहा पिस्टल आणि 67 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना अटक
प्राणघातक अग्निशस्त्र विक्री करण्याच्या उद्देशाने ते जवळ बाळगणाऱ्या तीन आरोपींना मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकांने अटक केली आहे. पायधुनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 2 पिस्टल,1 रिव्हॉलवर,3 गावठी कट्टे आणि 67 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पायधुनी परिसरात प्रभू हॉटेल जवळ 3 व्यक्ती बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंबई खंडणी विरोधी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकांने सापळा रचून 3 आरोपींना अटक केली आहे.
अटक आरोपींकडून पोलिसांना 2 पिस्टल, 1 रिव्हॉल्व्हर, 3 गावठी बनावटीचे कट्ट्यांसोबत 67 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अभिषेक कुमार पटेल (वय 26 वर्षे), सिद्धार्थ सुभोध कुमार गोलू (वय 23 वर्षे) आणि रचित रमशिषकुमार मंडळ (वय 27 वर्षे) अशी अटक आरोपींची नावं आहेत.
या सर्व आरोपींच्या विरोधात पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आरोपींनी कुठून हा अग्निशस्त्राचा साठा आणला होता, मुंबई शहरात कोणाला विकणार होते, त्यांचे टार्गेट कोण होते या संदर्भात अधिक तपास मुंबई पोलिसांचे खंडणी विरोधी पथक करत आहे.
ही बातमी वाचा: