मुंबई गुन्हे शाखेकडून बेस ऑईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक, 98 लाखांचं बेस ऑईल जप्त
मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर युनिटने बेस ऑईलची चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी 98 लाख 72 हजार रुपये किंमतीचं 44 हजार 396 लिटर बेस ऑईल आणि दोन टँकर जप्त केले
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर युनिटने (CIU) बेकायदेशीर वाहतूक आणि बेस ऑइलची चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी 98 लाख 72 हजार रुपये किंमतीचं 44 हजार 396 लिटर बेस ऑईल आणि टाटा कंपनीचे दोन टँकरही जप्त केले आहेत. युनिटने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये एका आघाडीच्या पेट्रोलियम कंपनीच्या काही सुपरवायझरचा सहभाग असावा असा संशय पोलिसांना आहे.
सीआययूने अटक केलेल्या दोन आरोपींना पुढील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या ताब्यात दिलं आहे. श्याम अवधेश कुमार सिंह उर्फ बाबलू (वय 39 वर्ष, रा. कुर्ला) आणि आशुतोष केदारनाथ श्रीवास्तव (वय 22 वर्ष, बरकत अली नाका, वडाळा) अशी दोन आरोपींची नावे आहेत. सीआययू अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
सीआययूचे पोलीस हवालदार गावडे यांना 7 जून रोजी विश्वसनीय सूत्रांद्वारे हिंदुस्थान पेट्रोलियमजवळील वडाळा पूर्व येथे बेस ऑईल चोरीची माहिती मिळाली होती. काही सराईत गुन्हेगार वैध कागदपत्रांशिवाय बेस ऑईलची मोठ्या प्रमाणात वाहतूक करत आहेत. तसंच गंतव्यस्थानाच्या वाटेवर अधूनमधून निर्जन ठिकाणी टँकर थांबवत आहेत आणि चुकीच्या फायद्यासाठी तेल चोरत आहेत, असं त्यांना समजलं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सीआययू, डीसीबी, सीआयडी यांनी उपरोक्त ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी 44 हजार 000 लिटर डिझेल असलेले दोन टँकर सापडले. टँकर चालकांकडे वाहतुकीची कागदपत्रे नव्हती.
छाप्यादरम्यान एका टँकरचा चालक आणि घटनास्थळी उपस्थित असलेले आणखी काही लोक पसार झाले. त्यापैकी एक रॅकेटचा म्होरक्या आहे. एका आरोपीकडून किमान 360 लिटर डिझेलही जप्त करण्यात आले आहे, ज्याने ते टँकरमधून चोरल्यानंतर कंटेनरमध्ये ठेवले होते, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
पेट्रोलियम कंपन्यांकडून वाहतूक केलेले डिझेल थेट खरेदी केलेल्या व्यक्तीकडे जाते. "परंतु हे चालक, या परिसरात कार्यरत असलेल्या टोळीच्या संगनमताने टँकर वेगवेगळ्या ठिकाणी थांबवत आहेत, जिथे टँकरमधून शेकडो लिटर डिझेल काढलं जातं आणि नंतर स्वस्त दरात बाजारात विकलं जातं," असं गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
गुन्हे शाखेने यापूर्वी या भागात अशाच रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पेट्रोलियम कंपन्यांना पत्र लिहून त्यांच्या पर्यवेक्षकांचा तपशील आणि डिझेल भरण्याची प्रक्रिया आणि ते खरेदीदाराकडे कसं नेलं जातं याची माहिती मागवली होती. "डिझेल भरल्यानंतर, ते ड्रायव्हरला पावत्या देतात ज्यात वेळेचा उल्लेख आहे आणि खरेदीदार टँकर आल्यावर ते तपासू शकतो आणि त्यांच्या आगमनाच्या वेळ तपासू शकतो," अधिकारी पुढे म्हणाले. परंतु अनेकदा खरेदीदार डिझेलचे प्रमाण तपासत नाहीत.
अनेक वेळा चालक पेट्रोलियम कंपनी सोडल्यानंतर आणि डिझेल चोरलेल्या निर्जन ठिकाणी गेल्यानंतर पावत्या तयार करण्यात आल्या. त्यानंतर चालकांना त्यांच्या फोनवर टोळीशी संगनमत करुन पर्यवेक्षकांनी पाठवलेली ई-बिले मिळाली, असं अधिकाऱ्यांनी आढळलं. परंतु मंगळवारी चालक आणि डिझेल चोरणाऱ्या व्यक्तीकडे अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी कोणत्याही पावत्या नव्हत्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी टँकर आणि 98 लाख किमतीचे 44 हजार लिटर डिझेल जप्त केलं. ही टोळी दररोज वेगवेगळ्या टँकरमधून 20 हजार लिटरहून अधिक डिझेलची चोरी करत असल्याचंही अधिकाऱ्यांना आढळून आलं. परिसरात अशा 5 ते 6 टोळ्या सक्रिय आहेत.
आरोपी श्याम अवधेश कुमार सिंह उर्फ बाबलू आणि आशुतोष केदारनाथ श्रीवास्तव या दोन आरोपींविरोधात वडाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 379, 336, 285 आणि 34 तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.