Mira Bhayander : एचडीएफसी बँकेचा गोंधळ, मीरा-भाईंदरमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांच्या खात्यातून 4 लाख 90 हजारांचा गहाळ व्यवहार
Mira Bhayander Bank News : हा व्यवहार होत असताना आपल्याला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, किंवा कोणताही ओटीपी आला नाही अशी तक्रार माजी नगरसेवकाने केली आहे.

ठाणे : भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्या बँक खात्यातून तब्बल 4 लाख 90 हजार रुपये अनधिकृतरीत्या डेबिट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसा आरोप शेट्टी यांनी केला आहे. मिरा रोड येथील एचडीएफसी बँकेच्या सिल्वर पार्क शाखेत (HDFC Mira Road) हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अरविंद शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या बँक खात्यातून काही संशयास्पद व्यवहार झाले असून, संबंधित व्यवहारांसाठी त्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा ओटीपी मिळालेला नाही. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर नागरिकांमध्ये बँकेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी नगरसेवकांचे पैसही सुरक्षित नाही, मग सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
या आर्थिक फसवणुकीबाबत तातडीने तपास करण्यात यावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि ग्राहकांच्या रक्कमेची संपूर्ण जबाबदारी बँकेने घ्यावी, अशी मागणी आता होत आहे. बँक व्यवस्थापनाने यासंदर्भात तपास प्रक्रिया सुरू केल्याचे समजत आहे.
Mira Bhayander News : उघड्या गटारात व्यक्ती पडल्याने खळबळ
मिरा-भाईंदरमधील काशीमिरा परिसरातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत साई पॅलेस हॉटेलजवळ असलेले उघडे आणि मोठ्या उंचीचे गटार गंभीर अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा सूर आजवर अनेकदा ऐकू आला आहे. याच उघड्या गटारात सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एक व्यक्ती पडल्याची धक्कादायक घटना घडली.
स्थानिकांच्या मदतीने आणि वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने त्या व्यक्तीला वाचवण्यात आले. गटार अत्यंत खोल आणि रुंद असल्याने जेसीबीच्या साहाय्याने त्याची सुटका करावी लागली, ही बाब चिंताजनक आहे. फाउंटन परिसरापासून मीरा-भाईंदर-दहिसर दिशेकडे येणाऱ्या महामार्गालगत हा रुंद नाला असून, त्यावर कोणतीही झाकणे नाहीत. हजारो वाहने या मार्गावरून रोज ये-जा करत असतात. दुचाकी, तीन चाकी अथवा चारचाकी वाहनामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास ते थेट गटारात कोसळण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा:























