(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime: पतीला कोंडून घालून विवाहितेला घरातून ओढून नेत अत्याचार , कोल्हापुरातील धक्कादायक घटना
संशयितावर कर्नाटकात दहा गुन्हे दाखल आहेत. पीडिता संशयिताच्या घरी भांडी घासण्याचे काम करत होती. पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता त्याची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Kolhapur Crime: पतीला कोंडून घालून पत्नीला घरातून ओढून नेऊन बलात्कार केल्याची संतापजनक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) शिरोळ तालुक्यातील चिपरीमध्ये घडली. पीडिताने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित नराधमाला अटक केली आहे. अस्लम हुसेनसाब सवनूर (वय 35, रा. चिपरी बेघर, चिपरी ता. शिरोळ) असे त्या संशयिताचे नाव असून तो आचारी काम करतो. जयसिंगपूर पोलिसांनी बुधवारी रात्री रेल्वे स्टेशनजवळून त्याला अटक केली.
विवाहितेला घरातून ओढून नेले
पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता त्याची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. संशयितावर कर्नाटकात दहा गुन्हे दाखल आहेत. पीडिता संशयिताच्या घरी भांडी घासण्याचे काम करत होती. ते एकमेकांचे शेजारी राहतात. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पीडिताच्या घरी येत संशयिताने दार ठोठावले. यावेळी महिलेनं दरवाजा उघडल्यानंतर संशयित अस्लमने तिला हात धरून बाहेर ओढले. यावेळी पत्नीचा आवाज आल्याने पती बाहेर आला असता त्याने बाहेरून कडी लावून विवाहितेला तोंड दाबून जवळ असलेल्या विहिरीजवळ नेऊन बलात्कार केला. यानंतर त्याने जीवे मारण्याची धमकी देत पळून गेला. पीडिताने बुधवारी तक्रार दिल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली.
शिरोळमधील तरूणावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा
दरम्यान, अल्पवयीन मुलीचा शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी शिरोळमधील 22 वर्षीय तरूणावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. अवधूत अनिल कोळी असे त्याचे नाव आहे. अवधूत एका अल्पवयीन मुलीला वारंवार त्रास देत होता. पीडिताने जाब विचारला असता माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न केले नाहीस, तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत होता. पीडिताच्या वडिलांनी जाब विचारल्यानंतर त्याने शिवीगाळ केली होती. पीडिताच्या कुटुंबीयांकडून अवधूतविरोधात शिरोळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला शिरोळ पोलिस ठाण्यात बोलावले होते. यावेळी त्याने लघुशंकेचं कारण सांगून धुम ठोकली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी तीन तास शोध घेत पकडले. तीन तासांनी सापडल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या