
Nagpur Crime : मुलाच्या लग्नाच्या तोंडावर वृद्ध पतीने केली पत्नीची हत्या
Nagpur Crime : मुलाच्या लग्नाच्या तोंडावरच घरगुती वादातून वृद्ध पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.

नागपूर : मुलाच्या लग्नाच्या तोंडावरच घरगुती वादातून वृद्ध पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. रामदास बोरीकर असे हत्या करणाऱ्या 60 वर्षीय वृद्ध पतीचे नाव आहे. तर छाया बोरीकर (52 वर्षे) असे मयत पत्नीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.शनिवारी सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडल्यांनातर जुनी मंगळवारी परिसरात एकच खळबळ उडाली.
रामदास आणि छाया बोरीकर या दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांचा मोठा मुलगा सतीश बोरीकर याचे येत्या नऊ तारखेला लग्न होणार होते. रामदास आणि छाया या दोघांमध्ये नेहमी घरगुती कारणांवरून वाद होत असे. त्यामुळे रामदास बोरीकर हे पत्नी छाया आणि मुलांपासून गेल्या पाच वर्षांपासून वेगळे राहत होते. रामदास जुनी मंगळवारी परिसरात कन्या शाळेच्या मागे जुन्या घरात राहत होते. दरम्यान सतिश बोरीकर यांचे लग्न ठरल्यामुळे त्याने आपल्या वडिलांना सोबत राहण्याचा आग्रह केला, मात्र वडिलांनी याबाबत त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पुत्र सतिशने याबाबत आई छाया यांना सांगितले.
आईने मुलाच्या मनातील खंत ओळखून मी उद्या वडिलांना समजावून घरी राहण्यास घेऊन येते असे सांगितले. त्यानंतर छाया बोरीकर आज सकाळी दूध आणण्याकरिता 6.45 वाजता घरून निघाल्या आणि तिथून रामदास बोरीकर यांच्याकडे जाऊन पोहोचल्या. तिथे रामदास बोरीकर आणि छाया यांच्यात पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात रामदास बोरीकर यांनी पत्नी छाया बोरीकर यांच्या चेहऱ्यावर आणि पोटावर चाकूने वार करत गंभीर जखमी केले. मुलांना ही माहिती कळताच त्यांनी आईला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र उपचारादरम्यान छाया यांचा मृत्यू झाला होता. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी रामदास बोरीकर यांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
