Aurangabad Crime News: उधार पैसे न दिल्याने आला राग; म्हणून मित्राच्या आईचा केला घात
आरोपीने मयत महिलेला उसने एक लाख रुपये मागितले होते. मात्र तिने नकार दिल्याने आरोपीने तिची हत्या केली.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, घरात एकट्या राहणाऱ्या एका 65 वर्षे महिलेचा डोक्यात लोखंडी खलबत्ता टाकून हत्या करण्यात आली आहे. महिलेने उधार पैसे देण्यासाठी नकार दिल्याने रात्रीच्या सुमारास तिची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा मयत महिलेच्या मुलाचा वर्गमित्र होता. राजू ईसाक शेख असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बिडकीन येथील भारतनगरमध्ये राहणाऱ्या हलीमा वजीर शेख (वय 65 वर्षे, रा. जांभळी,ह.मु. बिडकीन ) यांचा तीन दिवसांपूर्वी घरात मृतदेह आढळून आला होता. यावेळी त्यांच्या डोक्याला जोरदार मारहाण करण्यात आली होती. तर घरातील बेड सुद्धा पेटवून देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, एक व्यक्ती रात्री तीन वाजेच्या सुमारास मयत महिलेच्या घराकडे जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला आणि तीन दिवसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
यामुळे केली हत्या....
मयत हलीमा शेख आणि आरोपी राजू दोन्ही नातेवाईक आहेत. तर मयत महिलेला वडिलांकडून मिळाली जमीन राजूच सांभाळायाचा. तसेच हलीमा यांचा मुलगा आणि राजू वर्गमित्र होते. दरम्यान महिलेची जमीन काही वर्षांपूर्वी शासकीय प्रकल्पात गेल्याने मोठा मोबदला मिळाला होता. त्यामुळे तिच्या अंगावर असलेलं सोनं आणि पैसे पाहून आरोपीची नियत फिरली. गेल्या काही दिवसांपासून तो महिलेकडे 1 लाख रुपयांची मागणी करत होता. पण महिलेने नकार दिला. त्यामुळे त्याने महिलेच्या घरी जाऊन तिची हत्या केली.
अशी केली हत्या...
राजू हा 1 जून रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास महिलेच्या घरी गेला. राजुची ओळख असल्याने महिलेने सुद्धा एवढ्या रात्री दरवाजा उघडून त्याला घरात येऊ दिलं. यावेळी महिलेने त्याला पिण्यासाठी पाणी दिलं. त्यानंतर पुन्हा त्याने पैश्याची मागणी केली. पण मयत महिलेने नकार दिला. त्यामुळे किचनमध्ये ठेवलेला खलबत्ता घेऊन खर्चीवर बसलेल्या हलीमा यांच्या डोक्यात राजुने जोरात मारत त्यांची हत्या केली. त्यानंतर घरातील बेड जाळून महिलेच्या अंगावरील सोनं घेऊन फरार झाला.
असा अडकला जाळ्यात....
पोलिसांनी महिलेच्या घराकडे जाणारे सर्व सीसीटीव्ही तपासले असता एक व्यक्ती दुचाकीवरून आल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या संपर्कातील लोकांची तपासणी सुरू केली. दरम्यान राजुची गाडीवर पोलीसांना संशय आला. सीसीटीव्हीत दिसत असलेल्या गाडीची नंबरप्लेट तुटलेली होती, समोरील भाग तुटलेला होता, गाडीला स्विच नव्हता. परंतु राजुच्या गाडीला नवीन नंबर प्लेट होती,समोरील भाग नवीन होता, स्विच नवीन होता. त्यामुळे पोलिसांची खात्री झाली आणि त्यांनी राजुची चौकशी केली. दरम्यान आपणच खून केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर बिडकीन पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.