Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरण; मुंबई पोलिसांकडून आणखी एका आरोपीला अटक
Lalit Patil : ललित पाटील ड्रॅग्ज रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे.
मुंबई : ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट (Drugs Racket) प्रकरणी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) आज आणखी एक यश मिळाले. मुंबई पोलिसांनी अमीर आतिक शेख या आरोपीला अटक केली. अमीर शेख हा मुंबईतील कुर्ला भागात वास्तव्यास आहे. साकीनाका पोलिसानी (Mumbai Sakinaka Police) ही कारवाई केली आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी अमीर शेख हा ललित पाटीलकडून ड्रग्ज खरेदी करत असे. हेच ड्रग्ज तो मुंबईत पुरवता होता. त्याचबरोबर शेख याने ललित पाटील याला नाशिकमध्ये एमडी ड्रग्जची फॅक्टरी उभारण्यासाठी आर्थिक मदत केली होती अशी माहिती तपासात समोर आलेली आहे.
आज शेखला पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे
मुंबई, नाशिक आणि पुणे शहराच्या विविध भागातून साकीनाका पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 17 आरोपींना अटक केली आहे. ललित पाटील, सचिन वाघ आणि इतर दोन आरोपीला साकीनाका पोलीस उद्या न्यायालयात हजर करणार आहेत.
रोझरी स्कूलच्या संचालकाला अटक
ललित पाटीलला मदत केल्याबद्दल रोझरी स्कुलचा (Rosary Education Society) संचालक विनय अरहाना (Vinay Aranha) याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विनय अरहाना हा देखील उपचाराच्या नावाखाली ललित पाटील असलेल्या 16 नंबरच्या वॉर्डमध्ये होता. त्यानेच ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याचं आता समोर आलं आहे.
ड्रग माफिया ललित पाटील पुण्यातील ससुन रुग्णालयातील (Sasoon Hospital Drug Racket) कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डमधे उपचारांच्या नावाखाली बंद होता. याच ठिकाणी रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाना अटकेत होता. विनय अरहाना याच्यावर एका सहकारी बँकेची 46 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. तोही याच 16 नंबर वॉर्डमध्ये उपचारांच्या नावाखाली बंद होता. दोघांची 16 नंबर वॉर्डमधे एकमेकांशी ओळख झाली होती आणि त्यातुन विनय अरहानाने ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. ललित पाटील ससुन रुग्णालयातून 2 ऑक्टोबरला निसटल्यानंतर आधी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला आणि तिथून सोमवार पेठेत पोहचला. तिथे विनय अरहाना याचा ड्रायव्हर दत्ता डोके हा कार घेऊन तयार होता. दत्ता डोकेने ललित पाटीलला पुण्याच्या बाहेर रावेतपर्यंत सोडले आणि स्वतः जवळचे दहा हजार रुपये देखील ललितला दिले. हे सगळे त्याने विनय अरहानाच्या सांगण्यावरून केले.