Kurla Bus Accident : कुर्ल्यात भरधाव बेस्ट बसनं पादचाऱ्यांना चिरडलं; आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू, तर 30 ते 35 जण जखमी
Kurla Bus Accident : मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, पाच जणांचा मृत्यू, 30 ते 35 जण जखमी असल्याची माहिती, कुर्ला एलबीएस रोडवरील घटना, घटनेचा सीसीटीव्ही समोर
Kurla Bus Accident : कुर्ला (Kurla Accident) एलबीएस मार्गावर झालेल्या मोठ्या अपघातात बेस्ट उपक्रमाच्या बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलं. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. या अपघातात 26 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बेस्ट बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच, पोलिसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
कुर्ला अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती. त्यावेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले. 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.
कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत मृतांचा आकडा 5 झाला आहे. तर जखमी 26 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय विष्णू गायकवाड(70), आफ्रीन अब्दुल सलीम शहा(19), अनम शेख(20), कणीस फातिमा गुलाम कादरी(55), शिवम कश्यप(18) अशी मृतांची नावं आहेत. ज्यावेळी हा अपघात घडला, त्यावेळी अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
कुर्ला येथील बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरे (54) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : Kurla Bus Accident CCTV : भरधाव बस, कार-रिक्षांना चिरडलं...कुर्ला बस अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO