Kurla BEST Bus Accident : कुर्ल्याच्या (Kurla Accident) गजबजलेल्या परिसरात बेस्टची भरधाव बेस्ट घुसली आणि 7 निष्पापांचा बळी घेऊनच थांबली. त्या दिवशी संपूर्ण मुंबई हादरली होती. कुणी आपली आई गमावली, कुणी मुलगी तर कुणी वडील... या घटनेचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पण, आज समोर आलेल्या व्हिडीओनं संतापाची लाट उसळली आहे. कुर्ल्याच्या अपघातात मृत्यू झालेल्या कणीस फातिमा अन्सारी यांच्या मुलानं माझ्या आईचे दागिने चोरीला गेल्याचा आरोप केला होता. तेव्हापासूनच खळबळ माजली होती. त्यानंतर आज त्यासंदर्भातला एक व्हिडीओ समोर आला आहे. मृत कणीस फातिमा यांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या एक हेल्मेट घातलेला तरुण काढून घेत असल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. 


मृत महिलेच्या हातातून बांगड्या काढतानाचा VIDEO व्हायरल 


सर्वांसमोर अगदी बिनधास्त हा तरुण मृत महिलेच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून घेत आहे. दरम्यान, व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, कुणीतरी हेल्मेट घातलेला एक युवक मृतावस्थेत पडलेल्या महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढत आहे. 'हाथ मे गोल्ड है', असा स्पष्ट आवाज व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. हेल्मेट घातलेला युवक सर्वांसमोर हे कृत्य करतोय, पण त्याला तिथे असलेल्यांपैकी कुणीच थांबवण्याचं धाडस करत नाही. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असं मुंबई पोलिसांचे म्हणणं आहे.




मृत कणीस फातिमा यांची मुलगी मेहरुनिशा यांनी सांगितलं की, "व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या भाऊ पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेला आहे. आमच्यासोबत असं झालंय, दुसऱ्या कुणासोबत असं व्हायला नको. आम्हाला खूप दुःख झालं. माझी आई तिथे काय अवस्थेत होती. तिचा मृत्यू झालेला, तिचा मृतदेह होता आणि तो एक माणूस माझ्या आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढतोय. असा प्रसंग कुणावरच येऊ नये. माझं पोलिसांना एकच सांगणा आहे की, तुम्ही याच्यावर चांगली कारवाई करा. कोण होता? त्यानं असं का केलं? याची चौकशी करा." 


तो माणूस माझ्या आईच्या हातातून बांगड्या काढतोय... : मृत कणीस फातिमा यांची मुलगी 


"आम्हाला आमच्या आईची बॅग आणि मोबाईल दिला, सोन्याच्या बांगड्या दिल्याच नाही. ज्यावेळी अपघातानंतर आईला बाबा रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी तिचे कानातले होते सोन्याचे, पण तिथून बाहेर आणल्यानंतर तिच्या कानात काहीच नव्हतं.", असं मेहरुनिशा यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आम्हाला फक्त बॅग आणि मोबाईल मिळाला, तेसुद्धा माझ्या लहान भावाशी तो माणूस बोलला. त्यानं माझ्या भावाला फोन केला. हा मोबाईल आणि पर्स मिळाली आहे आम्हाला तुमची आई आहे का ती? माझा भाऊ तिथून पळत पळत गेला आणि त्या माणसानं माझ्या भावाकडे फक्त मोबाईल आणि पर्स दिली. बाकी काहीच मिळालं नाही. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, तो माणूस माझ्या आईच्या हातातून बांगड्या काढतोय. पण त्या बांगड्या आम्हाला नाही भेटल्या. आईच्या हातातल्या बांगड्या आणि कानातले सोन्याचे होते. पर्समध्ये 40 रुपये होते. त्यासोबत आई आणखी एक छोटी पर्स घेऊन जायची, पण ती सापडली नाही, त्यात काय होतं ते आम्हाला माहिती नव्हतं."




माणुसकी नाहीच आहे, या जगात... एवढी माणसं मृत्यूमुखी पडली आणि तुम्ही फायदा उचलताय. हे चुकीचं आहे ना... कुणावर विश्वास ठेवायचा आम्ही? आमची तर आई गेली, ती तर परत येणार नाही. पण ही गोष्ट अजिबात चांगली नाही, मृतदेहाच्या हातातल्या बांगड्या तुम्ही काढताय. वाईट वाटतं खूप, असं कुणासोबतच व्हायला नको. वस्तू गेल्या याचं काही वाटत नाही, पण माझ्या आईचा मृत्यू झालेला असताना तिच्यासोबत असं केलं जातं हे चुकीचं आहे, असंही मेहरुनिशा म्हणाल्या. 


माझी आई रक्त्याच्या थारोळ्यात पडलेली, सोन्याच्या बांगड्या काढताना लाज नाही वाटली : मृत कणीस फातिमा यांची मुलगी 


माझी आई रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे आणि तो माणूस सोन्याच्या बांगड्या काढतोय, त्याला लाज तरी वाटते का? किती दुःख होतंय, आई कसल्या अवस्थेत आहे तिथे... खूप वाईट वाटलेलं हा व्हिडीओ पाहून... आज आमच्यासोबत झालंय, उद्या दुसऱ्या कुणासोबत होऊ नये असं. कसल्या परिस्थितीत आई होती आमची, आम्हाला तर तिचा चेहराही पाहायला मिळाला नाही.  


दरम्यान, कुर्ल्यातल्या बेस्ट बसच्या अपघातात सात निष्पापांचा जीव गेला. या अपघातात कुणी आपली मुलं गमावली, तर कुणी आपली आई. त्या कुटुंबात अवघ्या एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळं कुटुंबीयांची व्यथा, त्यांचं दु:ख हे कुणाच्याही हृदयाला पाझर फोडेल असंच आहे. अनेकजण तर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत, त्यांचा दोष काय? त्यांच्या वाट्याला हे भोग कुणामुळे? कुर्ल्यातील बस अपघातात ज्यांनी जीव गमावला, त्यांच्या कहाण्या सुन्न करणाऱ्या आहेत. पण, त्यासोबतच माणुसकीला काळीमा फासणारा आणि अत्यंत संतापजनक असा मृतांचे दागिने चोरतानाचा हा व्हिडीओ आहे.  


पाहा व्हिडीओ : Fatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या