दिल्ली: आज राज्याच्या राजकारणामध्ये घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, या भेटीनंतर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अजित पवार यांच्यासह पक्षांच्या अन्य बड्या नेत्यांनी शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली . यानंतर अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला संसदेत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार, सुनील तटकरे देखील होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज काय घडणार, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.


शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवार अमित शाहांच्या भेटीला


अजित पवारांनी आज शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये आणि राज्यात पार पडलेल्या दोन निवडणुकांनंतर आता या भेटीमुळे अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. ही भेट फक्त वाढदिवसासाठी होती की यामागे दुसरं काही कारण आहे का अशाही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता अजित पवार अमित शाहांना भेटण्यासाठी गेले आहेत, आज मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या भेटीगाठीमुळे राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. काल (बुधवारी) अमित शहा आणि जे.पी.नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या भेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांना भेट दिला आहे. त्यांच्या भेटीचे फोटो देखील समोर आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मोदींची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कालपासून पक्षाच्या श्रेष्ठींची भेट घेतली आहे. नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शाह त्यानंतर आज नरेंद्र मोदी यांची ते भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार संसदेत अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  


जगदीप धनखड यांनी शरद पवारांना शुभेच्छा देऊन कारकीर्दीचा केला गौरव 


शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यसभेत त्यांच्या अभिष्टचिंतनाचा सोहळा पार पडला. यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी शरद पवार यांना शुभेच्छा देत त्यांच्या कारकीर्दीचा गौरव केला. तत्पूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर अजित  पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला संसदेत पोहोचले. त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार, सुनील तटकरेदेखील आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज काय घडणार, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात 7 नेते, 5 मूर्ती !


देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर काल आणि आज पहिलाच दिल्ली दौरा केला. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. सदिच्छा भेटीतही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दिल्लीत अनोखे दर्शन घडवले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 7 नेत्यांच्या दिल्लीत भेटी घेतल्या आहेत. यात 5 वेगवेगळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवरायांची मूर्ती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची मूर्ती भेट दिली आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना गाय-वासरुची मूर्ती तर केंद्रीय मंत्री राजनाथसिंह आणि नितीन गडकरींना सिद्धीविनायकाची मूर्ती दिली आहे.