Kalyan Crime : अल्पवयीन मुलीची हत्या करून नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती
Kalyan Crime : कल्याण येथील अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
मुंबई : कल्याण (Kalyan Crime) येथील अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर वातवरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला (Vishal Gawali) पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण पोलिसांची सहा पथके त्याच्या मागावर होती. शेगाव येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण कल्याणला हादरवून सोडलं आहे. लोकांच्या मनात या घटनेवरुन प्रचंड रोष आहे. परवा संध्याकाळी कल्याण कोळसाडी परिसरातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह काल दुपारी कल्याण भिवंडी मार्गावरील बापगाव परिसरात एका कब्रस्तानमध्ये सापडला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या गावी लपून बसला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून तो कल्याणहून कसा पळाला, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
आरोपी विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला?
अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीने मृतदेह कल्याणच्या बापगावमध्ये फेकला. या घटनेनंतर त्याच्या पत्नीने आरोपी विशाल गवळीला कल्याणमध्ये न थांबण्याचा सल्ला दिला आणि तिच्या माहेरी जायला सांगितलं. विशाल गवळी कल्याणमधून बाहेर पडण्यापूर्वी एका बारमध्ये त्याने मद्यप्राशन केलं. कल्याणमधून ठाण्यात आणि ठाण्यातून आरोपीने दादर गाठलं. दादरहून त्याने एक्स्प्रेस ट्रेन पकडून शेगाव गाठले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीला आज कोर्टात हजर करणार
दरम्यान, आरोपीने स्वत:चा फोन बंद ठेवला होता. मात्र, सीसीटीव्ही आणि नातेवाईकांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून विशाल गवळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेचे डीसीपी अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. आरोपी विशाल गवळीचा ताबा कल्याण कोळशेवाडी पोलीस घेणार आहेत. कल्याण पोलिसांचे पथक नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. सध्या आरोपी विशाल गवळी गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. त्याचा ताबा घेऊन आज त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. तर काल मुंबईच्या सर जे जे रुग्णालयात अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या रुखमिनीबाई रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला आहे. मयत अल्पवयीन मुलीवर आज अंत्यसंस्कार होणार आहे.
आणखी वाचा
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका