JEE Paper Leak Case: जेईई-मुख्य परीक्षेदरम्यान सॉफ्टवेअर हॅक, सीबीआयकडून रशियन नागरिकाला अटक
JEE Paper Leak Case: गेल्यावर्षी जेईई-मुख्य परीक्षेदरम्यान (JEE Paper Leak Case) सॉफ्टवेअर हॅक करून हेराफेरी केल्याचे प्रकरण समोर आले होते. सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु होता.
JEE Paper Leak Case: गेल्यावर्षी जेईई-मुख्य परीक्षेदरम्यान (JEE Paper Leak Case) सॉफ्टवेअर हॅक करून हेराफेरी केल्याचे प्रकरण समोर आले होते. सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु होता. एक वर्षाहून अधिक काळ या प्रकरणाचा तपास केल्यानंतर, सीबीआयला जेईई मुख्य परीक्षा 2021 च्या (JEE-Mains Exam 2021) या हेराफेरी प्रकरणात आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. सीबीआयने या प्रकरणात रशियन नागरिक, मास्टरमाईंड हॅकरला ताब्यात घेतले आहे. मिखाईल शार्गिन (Mikhail Shargin) नावाच्या या व्यक्तीची या प्रकरणातील सहभागाबद्दल चौकशी केली जात आहे. सीबीआयने विदेशी नागरिक असणाऱ्या मिखाईल शार्गिन विरोधात 'लूक आउट सर्क्युलर' जारी केले होते.
याबद्दल माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियन नागरिक परदेशातून विमानतळावर आल्यावर केंद्रीय यंत्रणांनी सीबीआयला अलर्ट केले होते. जेईई परीक्षेत (JEE(Main)-2021 examination) छेडछाड केल्याप्रकरणी सीबीआयने तत्काळ त्या व्यक्तीला रोखले आणि विमानतळावरच ताब्यात घेतल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाच्या तपासात रशियन नागरिक हा मोठा हॅकर असल्याचे आढळून आले. हा परदेशी नागरिक या परीक्षा घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. ज्याने iLeon या परीक्षा घेण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड केली होती आणि परीक्षेदरम्यान संशयित उमेदवारांच्या संगणक प्रणाली हॅक करण्यात इतर आरोपींना मदत केली होती.
ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड
या घोटाळ्यात यापूर्वी 7 जणांना सीबीआयने अटक केली होती. जेईई-मुख्य परीक्षेदरम्यान सॉफ्टवेअर हॅक करून हेराफेरी केल्याच्या या प्रकरणात एका रशियन नागरिकाचा सहभाग असल्याचे देखील उघड झाले होते. याच व्यक्तीने JEE (मुख्य)-2021 परीक्षा घेण्यात आलेल्या ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड केली होती. परीक्षेदरम्यान संशयित उमेदवारांची कॉप्म्युटर सिस्टम हॅक करण्यात त्याने इतर आरोपींना मदत केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, सीबीआयने अॅफिनिटी एज्युकेशन आणि त्याचे तीन संचालक, सिद्धार्थ कृष्णा, विश्वंभर मणी त्रिपाठी आणि गोविंद वार्ष्णेय, तसेच इतर दलाल आणि सहकाऱ्यांविरुद्ध परीक्षेत कथित फेरफार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
पैसे घेऊन परीक्षेत फेरफार
या तिन्ही संचालकांनी जेईई मुख्य ऑनलाईन परीक्षेत फेरफार करून, उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना देशातील आघाडीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी इतर सहयोगी आणि दलालांसोबत कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणात हरियाणातील सोनीपत येथील निवडक परीक्षा केंद्रातून अर्जदारांच्या प्रश्नपत्रिका तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवल्या जात होत्या.
हेही पाहा :
Nagpur : JEE ई मेन्स परिक्षेतील गैरव्यवहार प्रकरण; नागपुरातील कोचिंग क्लासेसमध्ये CBI कडून तपासणी