(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon News : भाडेकरुच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध, जळगावमधील तरूणाला गमवावा लागला जीव
Jalgaon News Update : भाडेकरू म्हणून राहत असलेल्या विवाहितेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून विवाहितेच्या पतीने मित्रांच्या मदतीने तरूणाची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
Jalgaon News Update : अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून झाल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय, 33 रा. मेहरूण , जळगाव ) असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
प्रमोद याच्या घरी भाडेकरू म्हणून राहत असलेल्या विवाहितेसोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून विवाहितेच्या पतीने मित्रांच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
दोन दिवसांपासून प्रमोद शेट्टी बेपत्ता होता. पोलिस आणि त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावर आढळून आला. माहिती मिळताच पोलिस घटनासस्थळी दाखल झाले. पोलिसांच्या चौकशीतून प्रमोद याची हत्या झाल्याचे समोर आले. प्रमोद शेट्टी हा नेहमीप्रमाणे ड्युटीवरून घरी येण्यासाठी निघाला होता. मात्र दोन दिवस उलटूनही तो घरी परत आला नव्हता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला.
या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर खून करणारे दोघे जण जळगाव तालुक्यातील उमाळा येथील जंगलात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खून करणाऱ्या सत्यराज नितीन गायकवाड ( वय, 26 रा. गणेश नगर, जळगाव ) आणि सुनिल लियामतखाँ तडवी (वय 26 , रा. पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव ) या दोघांना अटक केली.
पुढील कारवाईसाठी अटक करण्यात आलेल्या दोघांना जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तडवी हा प्रमोद यांच्या घरात भाड्याने राहतो, त्याच्या पत्नीसोबत प्रमोद याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. या कारणावरुनच तडवी याने सत्यराज याला सोबत घेत प्रमोद याचा खून केला. दोघांनीही खूनाची कबूली दिली असून पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली आहे.
निर्घृण खून
प्रमोद याचा संशयितांनी धारधार शस्त्रांनी वार करून आणि दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आलाय. दरम्यान या धक्कादायक घटनेने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या