जळगाव हादरलं! माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला; तीन आरोपी अटकेत, पोलिसांनी काढली आरोपीची धिंड
कोयत्याच्या प्रहारांमुळे प्रभाकर चौधरी गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात नुकताच माजी नगरसेवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने एकच खळबळ उडाली होती. 26 ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर काही अज्ञात इसमांनी कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर शहरात मोठी दहशत पसरली होती. अखेर पोलिसांनी या हल्ला प्रकरणातील तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
पोलिसांची शिताफीने कारवाई
शहर पोलिसांनी प्रमुख आरोपी सोमा उर्फ सागर चौधरी, हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी या तिघांना चाळीसगाव शहरातूनच सापळा रचून अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांत दिलासा मिळाला आहे. आरोपींनी नगरसेवकावर केलेला हल्ला अत्यंत थरारक होता. कोयत्याच्या प्रहारांमुळे प्रभाकर चौधरी गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दहशत कमी करण्यासाठी आरोपींची धिंड
या हल्ल्यानंतर शहरात निर्माण झालेली भीती आणि आरोपींची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी विशेष पाऊल उचलले. तिन्ही आरोपींची पायी धिंड काढण्यात आली. यामुळे नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलिस आरोपींकडून अधिक माहिती घेऊन हल्ल्याच्या मागचे कारण, त्यामागील इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करतील. नगरसेवकावर हल्ल्याच्या घटनेमुळे चाळीसगाव शहर हादरून गेले होते. नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी अल्पावधीत तिन्ही आरोपींना जेरबंद करत त्यांची धिंड काढल्याने लोकांमध्ये कायद्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे. पोलिसांनी घेतलेली ही कडक भूमिका आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
11 जणांनी केली प्रियकराची हत्या, गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे नात्यातील एका मुलीच्या 26 वर्षीय प्रियकराला 11 जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी 11 आरोपींविरुद्ध कट रचून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 22 जुलै रोजी पिंपरीतील सांगवी परिसरात असलेल्या देवकर पार्कमधील एका खोलीत घडली. मृत तरुणाचे नाव रामेश्वर घेंगट असून, त्याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.























