ठाण्यात मनसुख हिरण पार्ट 2? पुन्हा एका व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला रेतीबंदर खाडीत
ठाण्यात पुन्हा एकदा एका व्यापाराचा संशयास्पद मृतदेह कळवा येथील रेती बंदर खाडीत सापडला आहे. या घटनेमुळे मनसुख हिरण हत्याकांडाची आठवण झाली आहे.
ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा एका व्यापाराचा संशयास्पद मृतदेह कळवा येथील रेती बंदर खाडीत सापडला. त्यामुळे ठाणेकरांना पुन्हा एकदा मनसुख हिरण हत्या प्रकरणाची आठवण झाली. मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत ज्या ठिकाणी सापडला होता, आज या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर ठाण्यातील एका सराफाचा मृतदेह आढळला. भरत जैन असे या सराफाचे नाव असून सहा दिवसांपूर्वी त्यांच्या चरई येथील दगडी शाळेजवळ असलेल्या बी. के. ज्वेलर्समधून अज्ञात व्यक्तीने गाडीत बसवून नेले होते. त्यानंतर ते परत घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसांकडे भरत हरवल्याची नोंद केली होती. त्यानंतर आज थेट त्यांचा मृतदेह आढळल्याने त्यांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे.
ठाण्याच्या मखमली तलाव परिसरात भरत जैन राहत होते. 14 ऑगस्ट रोजी त्यांना अज्ञात व्यक्तीने कारमध्ये बसवून नेले. त्यानंतर ते पुन्हा घरी आलेच नाहीत. ह्या व्यक्तीसोबत जाताना त्यांनी आपल्या पत्नीला एका तासात परत येतो असे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी ते परत न आल्याने पत्नीने पोलीस स्थानकात ते हरवल्याची नोंद केली होती. पोलिसांनी शोध घेतला असता एका टॅक्सी चालकाला चौकशीसाठी बोलावले होते. या टॅक्सीचालका सोबत आणि त्या अज्ञात व्यक्ती बरोबर भरत जैन तलाव पाळी परिसरात 8 तास फेऱ्या मारत होते. यापुढे नेमके काय झाले? भरत यांचा मृत्यू कसा झाला? याचा शोध आता नौपाडा पोलीस घेत आहेत.
त्यांच्या दुकानातील 10 ते 15 किलो चांदीही गायब झाल्याचा आरोप जैन यांचे मोठे बंधू सुनील जैन यांनी केला आहे. आज मुंब्रा रेतीबंदर, गणेश विसर्जन घाट याठिकाणी खाडी किनारी एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये दिली होती. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जैन कुटुंबीयही घटनास्थळी दाखल झाले. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. मात्र, त्याच्या अंगावरील कपडे भरत यांचेच असल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केल्याचे सुनील जैन यांनी सांगितले. तसेच या कपड्यांच्या खिशामध्ये भरत यांच्या दुचाकीची चावी आढळल्याने हा मृतदेह भरत यांचा असल्याचे स्पष्ट होते, असे सुनील यांनी सांगितले. याप्रकरणी नौपाडा पोलीस स्थानकात अपहरण आणि खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.