कोरोनाच्या भीतीमुळे 65 वर्षीय वृद्धाची आत्महत्या, बीडमधील खळबळजनक घटना
'मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे.' , अशी सुसाईड नोट लिहून एका 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केली आहे. सदर घटनेचं वृत्त संपूर्ण तालुक्यात पसरलं असून त्यामुळे भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे.
बीड : सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे अख्यं जग हतबल झालं आहे. कोरोनाला हरवण्यासाठी जगभरात अनेक प्रयत्न सुरु आहेत. अनेक वैज्ञानिकही या व्हायरसवर प्रभावी लस शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, या जीवघेण्या महामारीमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लोकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. अशातच कोरोनाला घाबरुन एका 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी येथे हा खळबळजनक प्रकार घडला आहे. 'मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे.' , अशी सुसाईड नोट लिहून आसाराम रामकिसन पोटे (वय ६५) या वृद्धाने आत्महत्या केली आहे.
एकीकडे कोरनाचे संकट वाढत असताना कोरोनाची भीतीसुद्धा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आसाराम पोटे यांना कुठलाही आजार नव्हता. तसेच त्यांनी गेल्या काही दिवसांत कुठेही प्रवास केलेला नव्हता. एवढचं काय तर ते कोणत्याही नवीन व्यक्तीच्या संपर्कातही आले नव्हते. केवळ कोरोनाविषयी बाहेर चर्चा ऐकून आणि सद्य परिस्थिती पाहून त्यांनी आपल्या शेतात एका झाडाला गळफास लावून चक्क आपलं आयुष्य संपवलं.
आत्महत्येपूर्वी आसाराम यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधूनच ही बाब समोर आली आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आसाराम यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. 'मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही', असं त्यांनी या चिठ्ठीत लिहिलं होतं. त्यामुळे त्यांनी केवळ कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या घटनेविषयी शहादेव पोटे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर घटनेचं वृत्त संपूर्ण तालुक्यात पसरलं असून त्यामुळे भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्र राज्यात आहेत. कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोकांचे कामधंदे बंद झाले आहेत. सध्या देशात लॉकडाऊन 5 सुरु असून त्याअंतर्गत अनलॉक-1 ला परवानगी दिली आहे. त्यामुळे अटी-शर्थींसह काही गोष्टी, उद्योगधंदे सुरु करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
गृहमंत्र्यांचं नागपूर बनतंय 'क्राईम कॅपिटल', आठ दिवसात पाच हत्या
औरंगाबादमध्ये गर्दी करणाऱ्याला हटकल्याने हवालदाराच्या अंगावर भिरकावला धारदार सुरा