गृहमंत्र्यांचं नागपूर बनतंय 'क्राईम कॅपिटल', आठ दिवसात पाच हत्या
नागपूर शहराचा विचार केला तर गेल्या एका आठवड्यात नागपुरात हत्येच्या पाच घटना घडल्या आहेत. तर लूट आणि सामूहिक बलात्काराच्या प्रत्येकी एक अशा दोन अत्यंत गंभीर घटना घडल्या आहेत.
नागपूर : राज्याची उपराजधानी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात लॉकडाऊन नेमकं जनतेसाठी खुला करण्यात आलाय की गुन्हेगारांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण म्हणजे गेल्या एका आठवड्यात नागपूर शहर आणि जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्ह्याच्या अत्यंत गंभीर घटना. रस्त्यावर गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध, रस्त्यावर लुटीच्या घटना, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना आणि एकानंतर एक आठ हत्यांच्या घटना घडल्या आहे. अशा अत्यंत गंभीर घटनांनी कोरोनाशी लढणारा नागपूर जिल्हा गुन्हेगारीमुळे रक्तरंजित होताना दिसून येत आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जिल्ह्यातच गुन्हेगारांनी शांतता भंग केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नागपूर शहराचा विचार केला तर गेल्या एका आठवड्यात नागपुरात हत्येच्या पाच घटना घडल्या आहेत. तर लूट आणि सामूहिक बलात्काराच्या प्रत्येकी एक अशा दोन अत्यंत गंभीर घटना घडल्या आहेत. या रक्तरंजित घटनांची सुरुवात झाली 28 मे पासून झाली आहे. नागपूरच्या पूर्वी टोकावर वसलेल्या पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत एका अनोळखी मजुरांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. चिमूट भर तंबाखूसाठी प्रवासी मजूराचे अमित काकडे व पुरुषोत्तम विश्वकर्मा यांच्यासोबत भांडण झाले. याच वादातून मद्यपान करून शुद्धी हरपलेल्या अमित काकडे आणि पुरुषोत्तम विश्वकर्माने त्या मजुराच्या डोक्यावर सिमेंटचा मोठा दगड मारून त्याची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असली तरी मृतकाचे ओळख अद्याप पटली नाही.
कापशी पुलाजवळ झालेल्या मजुराच्या हत्येचे आरोपी अटक होईल त्याच्या आधीच 30 मे रोजी बेसा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची माहिती समोर आली. अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या त्या 16 वर्षीय मुलीला तिचा रोहित रामटेके नावाचा मित्र फिरायला सोबत घेऊन गेला होता. मात्र, फिरायला न नेता धोक्याने तिला बेसा परिसरात एका ओळखीच्या व्यक्तीच्या फ्लॅटवर नेऊन रोहितने चंदू, आकाश आणि राजेश नावाच्या इतर तीन मित्रांच्या मदतीने त्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून सुटून आल्यानंतर मुलगी भेदरलेली होती. कुटुंबीयांनी विचारणा केल्यावर सुरुवातीला तिने काहीच सांगितले नाही. अखेर 30 मे रोजी तिने सर्व प्रकार कुटुंबियाना सांगितला. त्यानंतर तक्रार दाखल होऊन पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली आहे.
1 जून रोजी लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत मालधक्का या ठिकाणी धीरज साळवे नावाच्या तरुणाची अज्ञात आरोपींनी गळा आवळून हत्या केली. या घटनेचे आरोपी अद्यापपर्यंत अटक झाले नसून हत्येचा कारण ही पोलीस शोधू शकलेले नाही. त्यामुळे धीरज साळवे या तरुणाच्या हत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. धीरज नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्याचा राहणारा होता.
1 जून रोजीच नागपुरातील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आणि गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सिव्हिल लाईन्स परिसरात बाईकवर आलेल्या सहा लुटारुंनी ब्रिन्क्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून 18 लाख 31 हजार रुपयांची रोकड लुटून नेली. भर रस्त्यात दुपारी दोन वाजता झालेल्या या लुटीनंतर नागपुरात सुरक्षा व्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. गुन्हे शाखेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत 12 तासाच्या आत सहा पैकी चार लुटारुंना अटक करत लुटीची साडे सहा लाख रुपयांची रोकड जप्त केली. मात्र, अजूनही इतर दोघे लुटारु आणि उर्वरित बारा लाखांची रोकड जप्त होणे बाकी आहे.
2 जूनच्या पहाटे कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत भुलेश्वर नगर परिसरात राज डोरले या तरुणाची डोक्यावर लाकडी बॅटने हल्ला करून आणि गळा चिरून निघृण हत्या करण्यात आली. राज डोरले हा भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी होता. त्याच्या हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज याचे मुकेश नारनवरे आणि अंकित या तरुणांसोबत जुने वाद होते. काही आठवड्यांपूर्वी ही त्यांच्यात वाद झाले होते. मात्र, तेव्हा पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. घटनेच्या दिवशी राज याला एकटे साधून मुकेश नारनवरे आणि अंकित यांनी डाव साधत त्याची हत्या केली होती. हत्येनंतर दोघे स्वतः पोलीस स्टेशनला चालत जाऊन पोलिसांना शरण गेले होते.
3 जूनच्या रात्री यशोधरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत फुकट नगर परिसरात अन्नू ठाकूर या सराईत गुन्हेगाराची प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांनी हत्या केली. मृतक अन्नू ठाकूर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच जेल मधून पॅरोलवर सुटून बाहेर आला होता. जेलमधून बाहेर आलेल्या अन्नू ठाकूर पासून जुन्या वादाचे उट्टे काढण्यासाठी मोहम्मद कलीम उर्फ मक्खन अन्सारी, मेहबूब अली आणि उस्मान अली या प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारांनी हत्या केली. फुकट नगरमध्ये झालेल्या गुंडाच्या हत्येचे आरोपी अटक करुन पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.
4 जूनच्या दुपारी प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत गोपाळनगर परिसरात कार्तिक साळवी या केबल ऑपरेटरची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. कार्तिक बाईकवरून जात असताना दोन तरुणांनी त्याचा पाठलाग करत चालत्या बाईकवर डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करत त्याला खाली पाडले आणि एकानंतर एक असे डोक्यावर अनेक वार करत त्याची हत्या केली. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहे.
नागपूर शहरात गुन्हेगारीमुळे रोजच रक्त सांडत असताना ग्रामीण भागात ही गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातच एका कुख्यात गुन्हेगाराची हत्या झाली आहे.
29 मे रोजी काटोल मध्ये मुख्तार अली इराणीची हत्या करण्यात आली. मुख्तार अली कुख्यात गुन्हेगार होता. घटनेच्या दिवशी मुख्तार अली याने चिकन दुकानावर जाऊन दादागिरी करत उधारीवर चिकन मागितले होते. मात्र, दुकानदाराने ते देण्यास नकार दिल्यानंतर मुख्तार अलीने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने दुकानातील कामगाराच्या पाठीवर चाकूने गंभीर वार करत त्याला जखमी केले होते. रात्री पेठ बुधवार परिसरातील हेटी पुलावर पुन्हा उफाळून आलेल्या वादात मात्र सहा जणांनी मिळून मुख्तार अली इराणीची हत्या केली होती. या घटनेत पोलिसांनी चिकन दुकानदारासह सहा जणांना अटक केली आहे.
1 जूनच्या रात्री नागपूर जिल्ह्यातील कन्हान मध्ये राजू कश्यप या खाजगी कंपनीतील एका व्यवस्थापकाची सहा जणांनी चाकूने वार करून हत्या केली होती. पैशाच्या जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, या घटनेतील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता या घटनेमागे वसुलीचा वेगळा वाद असल्याची चर्चा कन्हान परिसरात सुरू आहे. पोलिसांनी या घटनेतील काही आरोपीना अटक केली आहे.
2 जूनच्या पहाटे नागपूर जिल्हयातील पाटनसावंगीमध्ये उदय नारायण यादव या ट्रक ड्रायव्हरची हत्या करण्यात आली होती. जेवताना उदय नारायण याचे दुसऱ्या चालकासोबत वाद झाल्याने त्यानेच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे अवघ्या एका आठवड्यात नागपूर शहर आणि ग्रामीण भागात एका नंतर एक हत्येच्या आठ घटना घडल्या असून अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि रस्त्यांवर लाखो रुपयांच्या लुटीच्या घटना ही घडल्या आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
Asha Workers in Nagpur | नागपूर शहरात आशा सेविकांना तुटपुंजा मोबदला; दिवसाला केवळ 33 रुपये