हाय प्रोफाईल डॉक्टर फरार, पोलिस तपास संशयात?; मृत ऋचासाठी सोशल मीडियातून आवाज, खा. प्रणिती शिंदेंची भेट घेणार
सांगोला तालुक्यातील उद्योगपती भाऊ साहेब रुपनर यांचा मुलगा डॉक्टर सुरज रुपनर याचा पंढरपुरातील प्रतिष्ठित असणाऱ्या कै. डॉ. संजय पाटील यांच्या मुलीसोबत 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता
Pune News Updates: पुणे : पुण्यातील (Pune News) बिल्डर विशाल अग्रवालच्या (Vishal Agarwal) प्रकरणात बड्या लोकांसाठी कायदा पाहिजे तसा वाकवतो येतो, हे पाहायला मिळालं. असं असतानाच सोलापूर जिल्ह्यातील एका आत्महत्येच्या घटनेनं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मात्र, आता या प्रकरणात सोशल मीडियावर राज्यातील डॉक्टर एकत्रितपणे आपला रोष व्यक्त करू लागल्यावर पुन्हा हा विषय चर्चेत येऊ लागला आहे. सांगोला येथील उद्योगपती आणि सध्या मुख्यमंत्री शिंदे गटात असणारे भाऊसाहेब रुपनर यांच्या डॉक्टर सुनेनं पतीच्या त्रासाला कंटाळून सहा जून रोजी सांगोला येथील राहत्या घरी पहाटे आत्महत्या केली. मात्र, पाच दिवस उलटूनही पोलिसांचा तपास अत्यंत संथगतीनं सुरू असल्यानं मुलीच्या कुटुंबानं आपला संताप व्यक्त केला आहे. डॉ. ऋचा हिच्या मागे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टर आणि नागरिकांनी आपली ताकद उभी करण्यास सुरुवात केली आहे. ऋचा हिला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे.
सांगोला तालुक्यातील उद्योगपती भाऊ साहेब रुपनर यांचा मुलगा डॉक्टर सुरज रुपनर याचा पंढरपुरातील प्रतिष्ठित असणाऱ्या कै. डॉ. संजय पाटील यांच्या मुलीसोबत 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुलंही झाली. मात्र, डॉ. सुरज याच्या बाहेरख्याली पणामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले होते . डॉ. सुरजच्या अनेक भानगडी पत्नी डॉ ऋचा समोर उघड झाल्याने तिने आपल्या कुटुंबाला हि परिस्थिती सांगितली होती . यातूनच डॉ सुरज हा डॉ रुचा ला वारंवार मारहाण करीत असल्याचे तिची आई श्रीमती सुनीता पाटील आणि भाऊ ऋषिकेश यांनी सांगितले . डॉ ऋचा हिच्या नावावर वडील कै संजय पाटील यांनी शहरातील अतिशय मोक्याचा भूखंड नावावर केला होता . या भूखंडावर एमआरआय मशीन घेण्यासाठी कर्ज काढून पैसे दे अशी मागणी डॉ. सुरज पत्नीकडे वारंवार करून तिला त्रास देत होता. मात्र डॉ ऋचा हिने यास नकार दिल्याने डॉ सुरज याचा त्रास वाढत गेला आणि यातच मानसिक दबावातून डॉ ऋचा हिने आत्महत्या केली असे फिर्यादीत नोंद करण्यात आले आहे. यानंतर मुलीचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील यांनी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
रुपनर दाम्पत्य फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज वसाहती मध्ये राहत होते. विशेष म्हणजे ते दोघेही एमडी रेडिओलॉजिस्ट होते त्यांचे पंढरपूर येथे हॉस्पिटल आहे. पती डॉक्टर सुरज यांची वागणूक व्याभिचारी असल्यानं आणि सातत्याने दिला जात असणाऱ्या शाररिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. ऋचा हिला आत्महत्या करण्याची वेळ आली.
खासदार प्रणिती शिंदेंची भेट घेणार
दरम्यान, भाऊसाहेब रुपनर हे आपल्या सत्तेच्या आणि पैशाच्या जीवावर दबाव टाकत असल्याचा आरोप डॉ. ऋचा हीच भाऊ करीत आहे तर आईनं आपल्याला न्याय मिळाला पाहिजे अशी आर्त हाक दिली आहे. पोलिसांकडून अजूनही डॉ. सूरजला पकडत नसल्यानं पाटील कुटुंबीय हतबल झाले आहे. यामुळेच आता सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर आणि नागरिकांनी सोशल मीडियावर जस्टीस फॉर डॉक्टर ऋचा पाटील, अशी मोहीम सुरु केली आहे. याबाबत डॉ. ऋचा हिचे सासरे भाऊसाहेब रुपनर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते बाहेरगावी गेले असल्याचं समजलं. आता या दोन लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी देखील भाऊसाहेब आणि त्यांच्या पत्नीवर येऊन पडली आहे. यातील व्हिलन म्हणून ज्याचा उल्लेख सोशल मीडियावर केला जातो, तो पती डॉ. सूरज गायब असून पोलीस शोध सुरू असल्याचं सांगत आहेत. डॉ. ऋचा हीचा मृतदेह कुटुंबानं पोलीस येण्यापूर्वी खाली का उतरवला, तिच्या पायाला आणि अंगावर जखमा कशा झाल्या, असे प्रश्न कुटुंबीय विचारात आहेत. आता या हाय प्रोफाइल केसमध्ये तातडीनं तपास होऊन आरोपी पतीला अटक न केल्यास सगळा रोष पुन्हा गृह विभागावर निघणार आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर याबाबत खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेणार असल्याचं समजतं.