(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मैत्रिणीसोबत गोव्याला गेला, गुगल मॅपने घात केला, कार चालवता चालवता थेट नदीत कोसळली, मित्र अजून बेपत्ता
गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावरील आखाडा येथे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगानं कार आली आणि थेट फेरी धक्क्यावरुन नदीच्या पाण्यात कोसळली.
Goa Crime : गोव्यात झालेल्या एका अपघातानं संपूर्ण राज्य हादरलं, पण त्यापेक्षा जास्त धक्का त्यामागची संपूर्ण कहाणी ऐकून बसेल. त्याचं झालं असं की, गोव्यातील सिवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावरील आखाडा येथे मध्यरात्री फेरी धक्क्यावरुन कार थेट नदीत कोसळली. गाडीत दोघेजण होते. त्यातील तरुणीनं प्रसंगावधान दाखवत वेळीच गाडीतून बाहेर उडी घेतली. पण, तिच्यासोबत असलेला मित्र मात्र अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. तरुणाचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात असून नदीत कोसळलेली कार पाण्याबाहेर काढण्यात आली आहे.
गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावरील आखाडा येथे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगानं कार आली आणि थेट फेरी धक्क्यावरुन नदीच्या पाण्यात कोसळली. यावेळी प्रसंगावधान राखता गाडीतील तरुणीनं गाडीबाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र, तिला गुजरातवरून भेटायला आलेला मित्र अद्याप बेपत्ता आहे. तिचा मित्र बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल, पोलिस यांनी नदीत गेलेली कार नौदलाची मदत घेत बाहेर काढली आहे.
जुने गोवा पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बाशुदेव भंडारी हा तरुण आपल्या मैत्रीणीला भेटायला गुजरातमधून गोव्यात आला होता. ती तरुणी गोव्यातील साखळी येथील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दोघेही भाड्याच्या कारनं फिरत होते. फिरता फिरता दोघे सांतइस्तेव इथे पोहोचले. यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती. दरम्यान, बाशुदेव यानं गुगल मॅपची मदत घेत घरी परतण्याचं ठरवलं.
तरुणानं गुगल मॅपची मदत घेतली आणि त्या दिशेनं गाडी नेण्यास सुरुवात केली. मिळेत तिथून वाट काढण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. याच प्रयत्नांत ते आखाडा-सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावर पोहोचले. काळोखात पुढच्या रस्त्याचा अंदाज न आल्यानं भरधाव कार थेट नदीच्या पाण्यात कोसळली. दोघांनाही काही कळण्यापूर्वीच नदीचं पाणी गाडीत शिरू लागलं. क्षणाक्षणाला पाणी वाढत होतं, गाडी पाण्यात जात होती. तेवढ्यात तरुणीनं प्रसंगावधान राखत तरुणीनं गाडीतून बाहेर येत आपला जीव वाचवला. पण, तरुण मात्र अद्याप बेपत्ता आहे. गाडी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. पण, गाडीत कोणीही नव्हतं. पोलिसांकडून बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे.