चल तुला चॉकलेट देतो, चिमुकलीला आमिष दाखवून घरात नेलं, अन्...; शेजाऱ्याकडून मुलीवर अत्याचार
नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानंच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 55 वर्षीय आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Nagpur Crime : नागपूर : आधी कोलकाता आणि नंतर बदलापुरातील अत्याचार प्रकरणानं संपूर्ण देश हादरला. तेव्हापासूनच अत्याचार करणाऱ्या नराधमांविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. नराधमांना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. अशातच महाराष्ट्राच्या उपराजधानीत घडलेल्या प्रकारानं पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या शेजारच्यानंच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नागपूरच्या (Nagpur Crime) कामठी भागांत आठ वर्षीय मुलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्याच नराधमानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी 55 वर्षीय आरोपी धनीराम वासनिक याला बेड्या ठोकल्या आहेत. चल तुला चॉकलेट देतो, असं सांगत आरोपीनं पीडित मुलीला आपल्या घरी नेलं आणि तिथेच तिचा गैरफायदा घेतला. एवढंच नाहीतर आरोपीनं पीडित मुलीला आपल्या घरी नेऊन दुष्कृत्य केलं आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलगी घाबरली आणि तिथून निघून आली.
घाबरलेल्या पीडितेनं सर्वात आधी आपलं घर गाठलं आणि त्यानंतर सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईनं तात्काळ पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीनं आरोपीला गाठलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपी पोलीस कोठडीत असून त्याचा कठोर शिक्षा व्हावी म्हणून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.