कारचालकाने वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरफटत नेलं, वसईमधील खळबळजनक घटना
Crime News : वसईमध्ये एका कारचालकाने वाहतूक पोलिसाला जवळपास दीड किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कारचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
Vasai Crime News : कारचालकाने वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे. वसईमध्ये ( Vasai ) घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी वाहतूक पोलिसाच्या तक्रारीनंतर माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार चालकाला अटक केली आहे. सावेश सिद्धिकी असे अटक केलेल्या या कारचालकाचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्राला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसईमध्ये एका कारचालकाने सिग्नल तोडल्याने वाहतूक पोलिसाने त्याला थांबण्यास सांगितले. परंतु, कारचालकाने कार थांबवण्याऐवजी वाहतूक पोलिसाला जवळपास दीड किलोमीटर कारसोबत फरफटत नेले. रविवारी सायंकाळी वसईच्या वसंत नगरी सिग्नल जवळ ही खळबळजनक घटना घडली आहे.
काय घडलं त्या दिवशी?
वाहतूक पोलिस हवालदार सोमनाथ चौधरी हे रविवारी सायंकाळी वसईच्या वसंत नगरी सिग्नल जवळ कर्तव्य बजावत होते. यावेळी सर्कलवर रेड सिग्नल असताना एक कार चालक रेड सिग्नल तोडून पुढे आला. यावेळी सोमनाथ चौधरी यांनी त्याला हाताने कार बाजूला घेण्यासाठी इशारा केला. मात्र, कार चालकाने कार पुढे नेत चौधरी यांच्या अंगावरच गाडी घातली. चौधरी यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीच्या बोनेटवर चढले आणि गाडीच्या काचेच्या मधल्या जागेत पकडले. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी चालकाला कार थांबवण्यास सांगितलं. मात्र, चालकाने कार न थांबवता तशीच पुढे गोखिवराच्या दिशेने नेली. वसई रेंज नाका येथे इतर गाड्या पुढे आल्याने अखेर ती कार थांबली. परंतु, यावेळी दीड कोलोमीटरच्या अंतरात चौधरी कारच्या बोनेटवरच होते. त्यावेळी चालक भरधाव वेगाने कार चालवत होता.
सोमनाथ चौधरी हे बोनेटवर असल्याचे पाहून इतर वाहनचालकांनी कार थांबवण्याचा इशारा केला. परंतु, यावेळी चालक “मरने दो साले को” अशी अरेरावीची भाषा करत होता. या घटनेनंतर चालक सावेश सिध्दीकी आणि त्याच्या सोबतचा मित्र प्रितम चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहूतक पोलीस चौधरी यांच्या तक्रारीनंतर कार चालक सावेश सिद्धिकी याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 353, 307, 308 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सावेश सिद्धिकी हा 19 वर्षाचा असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या