डोंबिवलीत धक्कादायक प्रकार, बँकेची आणि खातेदारांची तब्बल 3 कोटींची फसवणूक
dombivli Latest Crime News : बँकेतील रिलेशन शिप मॅनेजरने साथीदारांच्या मदतीने बँकेला व बँक खातेदारांना तब्बल तीन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
Dombivli Latest Crime News : डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग येथील आयसीआयसीआय या बँकेतील रिलेशन शिप मॅनेजरने साथीदारांच्या मदतीने बँकेला व बँक खातेदारांना तब्बल तीन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. सदर बाब लक्षात येताच या प्रकरणी बँक प्रशासनाने रिलेशन शिप मॅनेजर आशीष याख्मी व त्याच्या इतर साथीदारांविरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
2019 पासून ते फेब्रुवारी 2021 पर्यंत डोंबिवली एमआयडीसीतील ममता रुग्णालय शेजारील आयसीआयसीआय बँक शाखेत हा गैरप्रकार सुरू होता. आयसीआयसीआय बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर आशीष याख्मी आणि त्याच्या साथीदारांनी संगनमत करून आयसीआयसीआय बँक खातेदारांच्या परवानगी शिवाय ग्राहकांच्या खात्यात असलेल्या रकमा, त्यांच्या ठेव मुदतीच्या पावत्यांवर स्वताचे मित्र, वडिल यांच्या नावे व्यवहार करून काही रकमा काढून घेतल्या. ज्या ग्राहकांनी गुंतणुकीसाठी धनादेश दिले. त्या धनादेशांवर खाडाखोड करून, नावे बदलून, बनावट स्वाक्षऱ्या करून त्या धनादेशांवरील रकमा लबाडीने स्वताच्या नावे काढून घेतल्या. हे सगळे व्यवहार सुरू असताना बँक आणि ग्राहकांना कोणताही सुगावा लागणार नाही याची काळजी आरोपी आशीष व त्याचे साथीदार घेत होते.
ग्राहकांची खाती, त्यांच्या ठेव रकमांच्या बदल्यात आयसीआयसीआय प्रुडेन्शीअल पॉलिसी काढल्या आहेत. बँकेच्या अंतर्गत तपासणीत हा गैरव्यवहार उघडकीला आला आहे. याप्रकरणाची बँकेने स्वतंत्र चौकशी केली. त्यावेळी जनसंपर्क व्यवस्थापक याख्मी व त्याच्या साथीदारांनी हा गैरप्रकार केल्याचे पुढे आले. बँक आणि ग्राहकांची फसवणूक केल्याने बँकेने तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.