Dombivli Crime : तरुणीने लग्नास नकार दिला, कुटुंबियांनी दम भरला, धडा शिकवण्यासाठी तरुणाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला
Dombivli Crime : जिच्यावर प्रेम करतो ती लग्न करण्यास तयार नाही, तिचे कुटुंबीय देखील दम देतात, त्यामुळे अखेर तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी तरुणाने या सर्वांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची घटना उघडकीस आली आहे.
Dombivli Crime : जिच्यावर प्रेम करतो ती लग्न करण्यास तयार नाही, तिचे कुटुंबीय देखील दम देतात, त्यामुळे अखेर तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी माथेफिरु तरुणाने या सर्वांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा (Kidnap) बनाव रचल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईजवळच्या डोंबिवलीमधील (Dombivli) हा प्रकार आहे. अपहरण झाल्याचे कळताच तरुणाचे वडील आणि पोलीस यंत्रणेने त्याला शोधण्यासाठी जंगजंग पछाडले. तब्बल दहा तास पोलिसांची तारांबळ उडाली होती. मात्र अखेर हा सगळा बनाव असल्याचे समोर आले. दहा तासांच्या तपासाअंती अखेर माथेफिरु तरुणाला शोधून काढले. त्यानंतर खरी परिस्थिती आणि अपहरणाच्या बनावाचं कारण ऐकून पोलिसांनी डोक्यावरच हात मारला.
तरुणाचं एकतर्फी प्रेम, तरुणीचा नकार
डोंबिवली पूर्वेतील दत्त नगर परिसरात हा माथेफिरु तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. त्याचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याला तरुणीशी लग्न देखील करायचं होतं. मात्र तरुणीचे कुटुंबीय लग्नाला तयार नव्हते. तरुणीच्या कुटुंबीयांनी या तरुणाची समजूत काढली, मात्र तो काही ऐकण्यास तयार नव्हता. अखेर तरुणीच्या कुटुंबीयांनी या तरुणाला दम दिला. त्यामुळे हा तरुण संतापला होता. तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना धडा शिकवण्याचा निश्चय त्याने केला.
तरुणाच्या बाबांच्या फोनवर मेसेज आणि पोलिसांकडून शोध सुरु
या दरम्यान तरुणाच्या मोबाईल फोनवरुन त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर मेसेज आला. "तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. पोलिसांना सांगितलं तर बॉडी घरी येईल, असे या मेसेजमध्ये लिहिल होतं. घाबरलेल्या वडिलांनी रामनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाचा शोध सुरु झाला. दहा तासांच्या तपासादरम्यान तरुणाच्या मोबाईल फोनच्या लोकेशनच्या मदतीने धक्कादायक माहिती समोर आली, त्यामुळे पोलिस देखील चक्रावले.
तरुणीच्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अपहरणाचा बनाव : पोलीस
या तरुणाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला होता. त्यानेच आपल्या वडिलांना खोटे मेसेज पाठवले होते. त्याचे ज्या तरुणीवर प्रेम होते, जिच्यासोबत त्याला लग्न करायचे होते, तिने आणि तिच्या कुटुंबियांनी लग्नासाठी नकार दिला तसंच धमकावलं. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या माथेफिरु तरुणाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले आहे, अशी माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.