धुळ्यात देशी दारूच्या दुकानासाठी वीजचाेरी करताच इसमानं डाव साधला, 30 हजाराची लाच घेतली पण झालं भलतंच
कंपनीच्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगत "सेटलमेंट" करून देण्याच्या बहाण्याने तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली. पण तक्रारदाराने थेट गाठलं लाचलुचपत कार्यालय अन्..

Dhule Crime News: धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या अनेक घटना घडतायत. शहरातील देवपूर परिसरात असलेल्या देशी दारूच्या दुकानातील विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचा आरोप करत 30 हजार रुपयांची लाच घेताना एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव मुकुंद दरवडे असे आहे.
मुकुंद दरवडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 30,000/- रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून मुकुंद दरवडे यांचेवर सापळा लावला असता त्यांनी तक्रारदार यांच्या जैस्वाल लिकर बार या दुकानावर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
नक्की झाले काय?
तक्रारदार यांचे देवपूर, धुळे येथे 'जैस्वाल लिकर बार' नावाचे देशी दारूचे दुकान आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (म.रा.वि.वि.) तर्फे जुने मीटर काढून नवीन मीटर बसवण्याचे काम सुरू होते. या अंतर्गत सुमारे 15ते 20 दिवसांपूर्वी तक्रारदार यांच्या दुकानातील विजेचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसवण्यात आले. हे काम म.रा.वि.वि. कंपनीच्या वतीने मुकुंद दरवडे या खासगी व्यक्तीकडून करण्यात आले होते. यानंतर दरवडे यांनी वेळोवेळी तक्रारदारांच्या दुकानात येऊन जुन्या मीटरची तपासणी झाली असून त्यात छेडछाड करून वीज चोरी केल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. यासोबतच त्यांनी म.रा.वि.वि. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगत "सेटलमेंट" करून देण्याच्या बहाण्याने तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली. अन्यथा 46 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, अशी धमकीही दिली. या प्रकारामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात प्रत्यक्ष हजर जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार, दरवडे हे जैस्वाल लिकर बारमध्ये आले असता त्यांनी 30 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा:























