Dhule Crime News : धुळे जिल्ह्यात 64 अवैध सावकारांवर 15 गुन्हे दाखल; सहा जणांना अटक
Dhule Crime News : धुळे पोलिसांनी अवैध सावकारांविरोधात कारवाई सुरू केली असून सहा जणांना अटक केली आहे. मागील 100 दिवसांत 64 सावकारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Dhule Crime News : धुळे जिल्हा पोलिसांनी अवैध सावकारी विरोधात कंबर कसली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 100 दिवसात तब्बल 64 सावकारांवर 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सहा सावकारांना अटक करण्यात आली आहे
धुळे शहरातील रहिवासी असणाऱ्या जयेश दुसाने यांनी अवैध सावकार राजेंद्र बंब याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. दुसाने हे बंब याच्याकडे मागील 10 वर्षांपासून काम करत होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने अवैध सावकारांच्या मुसक्या आवळण्याची धुळ्यात मोहीम सुरू केली. राजेंद्र बंब यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केल्यानंतर त्यांच्याकडून कोट्यावधी रुपयांचे घबाड हाती लागले. त्याआधी 26 मार्च रोजी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अवैध सावकारी विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता. यानंतर खाजगी सावकारी प्रकरणी विविध गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली.
पोलीस प्रशासनाने देखील या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत कारवाईचा धडाका सुरू केला. यामुळे 26 मार्चपासून सुरू झालेल्या गुन्ह्यानंतर गेल्या शंभर दिवसात तब्बल 64 जणांवर 15 गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत चार महिलांचा देखील समावेश असून यातील सर्वाधिक गुन्हे हे व्यवसाय वाढीसाठी घेतलेल्या कर्जातून दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
धुळे शहरातील अवैध सावकार राजेंद्र बंब याच्यावर सहा गुन्हे दाखल झाले असून एक अदखलपात्र स्वरूपाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या कारवाईत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने राजेंद्र बंब यांच्याकडील मालमत्ता जप्त केली आहे. पोलिसांनी बंब याच्याकडून आतापर्यंत 12 कोटी 25 लाख 10 हजार 760 रुपये रोख रक्कम, तर 6 कोटी 20 लाख 4 हजार 444 रुपयांचे सोने, 5 लाख 27 हजार 411 रुपयांचे चांदी, आणि 3 हजार मुदत ठेवीच्या पावत्या जप्त केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
