Delhi News : न्यायालयाकडून दोन कुटुंबांना अनोखी शिक्षा, 400 झाडं लावून पाच वर्ष त्यांच्या देखभाल करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने भांडणात सहभागी असलेल्या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी 200-200 रोपे लावण्याचे निर्देश दिले असून त्यांचे पाच वर्ष संगोपन करण्याचे आदेश दिले आहेत.
Delhi High Court : दोन कुटुंबातील भांडणाच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अनोखा निकाल दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने भांडणात सहभागी असलेल्या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी 200 रोपे लावण्याचे निर्देश दिले आहेत. एवढंच नाही तर या झाडांची लागवड करून पाच वर्षे त्यांची काळजीही दोन्ही कुटुंबांना घ्यावी लागणार आहे. क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबातील भांडण कोर्टात पोहोचलं आणि या प्रकरणात न्यायालयाने हा अनोखा निकाल दिला आहे.
दिल्ली हायकोर्टाकडून दोन कुटुंबांना अनोखी शिक्षा
क्षुल्लक कारणावरून भांडण करणाऱ्या दोन कुटुंबांतील वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने अनोखी शिक्षा सुनावली आहे. उच्च न्यायालयाने दोन्ही कुटुंबीयांना आपापल्या परिसरात प्रत्येकी दोनशे रोपे लावण्याचे निर्देश दिले आहेत. समाजासाठी योगदान देऊन त्यांची 'नकारात्मक ऊर्जा' दूर करता येईल, हा त्यामागचा उद्देश आहे. न्यायालयाने सांगितलं की, दोन्ही पक्षकारांनी झालं लावायचे आहेत आणि त्यांची पाच वर्षे काळजी घ्यायची आहे.
400 झाडं लावून पाच वर्ष त्यांच्या देखभाल करण्याचे आदेश
दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटलं की, दोन्ही कुटुंबांना समाजासाठी योगदान देण्याचे निर्देश देऊन त्यांची नकारात्मक ऊर्जा संपवली पाहिजे. त्यामुळे दोन्ही प्रकरणांतील याचिकाकर्त्यांना त्यांच्या भागात प्रत्येकी 200 झाडे लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दोन्ही कुटुंबांनी प्रत्येकी 200-200 झाडं लावावीत आणि त्यांची पाच वर्षांपर्यंत काळजी घ्यावी. न्यायालयाने स्वेच्छेने दुखापत, घरामध्ये घुसखोरी, दुखापत, हल्ला किंवा चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध केल्याच्या आरोपाखाली नोंदवलेल्या दोन फौजदारी खटल्यांमधील एफआयआर आणि कार्यवाही रद्द करत हा निकाल दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पहिल्या एफआयआरमध्ये, तक्रारदाराने सांगितले की, हे प्रकरण 4 मार्च 2017 चा आहे, जेव्हा एका कुटुंबातील तीन सदस्य त्यांच्या घरी आले आणि त्यांना एका राजकीय पक्षाच्या योजनेअंतर्गत ब्लँकेट मिळवून देण्यासाठी त्यांच्या ओळखपत्रांची मागणी केली. फिर्यादीने तिघांना सांगितले की, ते दुसर्या राजकीय पक्षाचे समर्थक आहेत, ज्यामुळे शाब्दिक वाद आणि नंतर हाणामारी झाली.
दुसऱ्या एफआयआरमध्ये विरुद्ध पक्षाने असा आरोप केला की, ते ब्लँकेट वाटपाच्या उद्देशाने ओळखपत्र गोळा करत असताना दुसऱ्या कुटुंबाने त्यांच्याशी भांडण केलं आणि त्यांना मारहाण केली. जानेवारीमध्ये दोन्ही पक्षकारांमधील भांडण एकमेकांच्या सहमतीने मिटवलं होतं.
संबंधित इतर बातम्या :