Crime News : फरार आरोपीचा हल्ला, पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीबारात आरोपी जखमी; लातूरमध्ये मध्यरात्री फिल्मी स्टाइल थरार
Crime News : फरार आरोपीची धरपकड करण्यास गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर आरोपीने हल्ला केला. स्वसंरक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्याने आरोपीवर गोळ्या झाडल्या.
Crime News : दोन महिन्यांपूर्वी चाकूर पोलीस कोठडीतून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच आरोपीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळी झाडल्याची घटना लातूर येथील श्रीनगर भागात घडली आहे. जखमी आरोपीवर उपचार सुरु आहेत. लातूर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चापोली शिवारात जागेच्या वादातून सचिन दावणगावे या 26 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणतील मुख्य आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड यास चाकूर पोलिसांनी अटक केली होती. मात्र चाकूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुख्य आरोपी पळून गेला होता.
अनेक राज्यात तपास
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये शोध सुरू केला. त्याशिवाय, इतर राज्यातही तपास पथक पाठवले होते. चंदिगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाना, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात शोध घेतला गेला. मात्र, आरोपी प्रत्येक ठिकाणावरुन पळून जाण्यात यशस्वी होत होता. अनेक दिवस आरोपी फरार होता.
शेवटी लातुरात सापडला
पोलिसांनी मात्र आरोपीचा पाठपुरावा सोडला नाही. अखेर आरोपी लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगर भागात असल्याची माहिती मिळाली. आरोपी एका भाड्याच्या खोलीत राहत असल्याची गुप्त माहिती चाकूरचे तपास अधिकारी बालाजी मोहिते यांना मिळाली. त्यांनी पोलीस यंत्रणेला तसेच सहकाऱ्यांना कल्पना देऊन आरोपीचे घर गाठले. घरासमोर पोलीस आल्याचे समजताच आरोपी नारायण इरबतनवाड हा पळून जाण्याच्या तयारीत होता.
नेमके काय घडले ?
त्यावेळी एकटे अधिकारी असलेले बालाजी मोहिते आणि आरोपीची झटापट झाली. यात आरोपीने पोलीस अधिकारी मोहिते यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिस अधिकारी बालाजी मोहिते यांना मानेवर आणि इतर ठिकाणी जबर मार बसला. तसेच एका हाताने त्यांचा गळा आवळल्याने त्यांना त्रास होऊ लागला होता. याच वेळी आरोपीने मोहिते यांच्या कमरेला असलेले रिव्हॉल्वर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी प्रसंगावधान राखून बालाजी मोहिते यांनी स्वसंरक्षणार्थ स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून मुख्य आरोपी नारायण इरबतनवाड याच्या कमरेखाली गोळी झाडली. यात आरोपी हा गंभीर जखमी झाला. आरोपीवर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
लातूरचे पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी सांगितले की, आरोपी हा अतिशय सराईत आणि गुंड प्रवृत्तीचा आहे. तो त्याच्या कोणत्या गुन्हेगारी नेटवर्कचा वापर करत होता यांची माहिती आम्ही मिळवत आहोत. या कारवाईतील पोलिस अधिकाऱ्याची प्रकृती बरी असून आरोपीवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिस करत असल्याचे त्यांनी सांगितले.