Jewelery shop robbery: ग्राहक बनून आला अन् सोन्याचा बॉक्स घेऊन पसार झाला....
कांदीवलीतील चारकोप परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या चोराने सोन्याच्या पेन्डंटची बॅग लंपास केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अधिकचा तपास करत आहेत. (Jewelery shop robbery).
मुंबई: कांदीवली परिसरातील एका सराफाच्या दुकानात चोरीची घटना घडली आहे. एक व्यक्ती सराफाच्या दुकानात ग्राहक बनून आला आणि सोन्याचा बॉक्स घेऊन फरार झाल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी कांदीवलीतील चारकोप पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस या चोराचा तपास घेत आहेत.
कांदीवलीच्या चारकोप परिसरातील भारत भूषण इमारतीतील पद्मावती ज्वेलर्समध्ये एक व्यक्ती ग्राहक बनून आला. त्याने दुकानदाराला सोन्याचे पेन्डंट दाखवायला सांगितले. तो दुकानदार त्या व्यक्तीला पेन्डंट दाखवत होता त्याचवेळी त्या व्यक्तीने दुकानातील पेन्डंटची बॅग घेतली आणि तो पळाला. या घटनेची तक्रार चारकोप पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून तसा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दाम्पत्यासह चिमुरडीला चाकूचा धाक दाखवून दरोडा; 23 लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार
चोरीची ही घटना 4 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घटना घडली तेव्हा दुकान मालक चेतन खिचा हे दुकानात एकटेच होते. ती वेळ साधून चोराने आपल्याला मंगळसूत्रासाठी काही पेन्डंट पाहिजे असे सांगितलं. त्यावेळी दुकानदाराने त्याला काही डिजाइन्स दाखवले. चोराने आपल्याला आणखी काही डिजाइन्स पहायचे असे सांगितल्यानंतर मालक दुसऱ्या बाजूला वळाला. तीच संधी चोराने साधली आणि तो पेन्डंट असलेली बॅग घेऊन पळाला.
या बॅगमध्ये 2.5 लाख रुपये किंमतीचे 18 पेन्डंट होते. मालकाने चोराचा पाठलाग केला पण चोर आपल्या साथीदारासह एका बाईकवरुन पसार झाला. चारकोप पोलिसांनी आयपीसी कलम 380 आणि कलम 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळीच्या सीसीटीव्हीमध्ये ही चोरी कैद झाली असून त्या आधारे पोलिसांनी चोरट्याच्या शोधाला सुरुवात केली आहे.
शहरात अलिकडे अशा घटनांमध्ये वाढ होत असून अशा चोरांच्या मुसक्या आवळणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं आहे.