(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrapur Drugs : विकासाचं माहित नाही, पण चंद्रपूरमध्ये ड्रग्ज पोहचलं; 20 लाख किंमतीचे 'एमडी' जप्त
MD Drugs Case : चंद्रपूर पोलिसांनी कारवाई करत दोघांना एमडी ड्रग्जसह अटक केली आहे.
चंद्रपूर : पोलिसांकडून मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नाशिकसह (Nashik) काही जिल्ह्यात ड्रग्जसचा साठा जप्त केला जात आहे. या अंमली पदार्थाची तस्करी करणारे, विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आता पोलिसांनी थेट चंद्रपूरमधून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे. चंद्रपूरमध्ये ही कारवाई झाली आहे. त्यामुळे विकासाची प्रतीक्षा असलेल्या जिल्ह्यात एमडी ड्रग्ज (MD Drugs) आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 20 लाखांच्या M.D. म्हणजे मॅफेड्रान पावडरसह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात मॅफेड्रान जप्त करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. पोलिसांना दोन इसम खाजगी कारने नागपूरवरून एमडी ड्रग्ज पावडर विक्री करीता पडोली चौक येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी संशयित चारचाकी वाहनाला थांबवले आणि झडती घेतली. त्यावेळी जवळपास 20 लाख रुपये किंमतीचे 198 ग्रॅम एमडी असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. शाहरूख मतलब खान (28 वर्ष, रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर) आणि साहील ईजराइल शेख (28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर) यांना अटक केली आहे.
मोखाडामध्ये पोलिसांची मोठी कारवाई; एमडी ड्रग्सचा 38 कोटींचा साठा जप्त
काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील एका फार्म हाऊसमध्ये असणाऱ्या ड्रग्ज निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्धवस्त केला होता. या कारवाईत पोलिसांनी 38 कोटी रुपये किंमतीच्या एमडीचा (MD Drugs) साठा जप्त केला होता. या कारखान्यात 18 हजार 100 ग्रॅम एमडी ड्रग्स तसेच हे ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारे रसायन, रासायनिक उपकरणे आढळून आली आहे. एकूण 38 कोटींच्या एमडी ड्रग्जसह 7 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असल्याची माहिती मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.
नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यवधींचं ड्रग्ज
ड्रग्ज माफिया (Drug Case) ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई नाशिकमध्ये केली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावा दरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गिरणा नदीच्या पात्रातून कोट्यवधीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.