(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! जालन्यात गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू; घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल
Jalna Crime News : गोळीबारात (Firing) मृत्यू झालेला व्यक्ती अनेक गुन्ह्यात आरोपी असल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
जालना: जिल्ह्यातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. जालना (Jalna) शहरातील मंठा चौफुली भागात गोळीबार करण्यात आल्याची घटना काही वेळापूर्वी घडल्याचं समोर आलं आहे. या गोळीबाराच्या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असल्याचं देखील समोर येत आहे. गोळीबारात (Firing) मृत्यू झालेला व्यक्ती अनेक गुन्ह्यात आरोपी असल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. गजानन तौर असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन आरोपींकडून गजानन तौर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली आहे. या गोळीबाराच्या घटनेत गजानन याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. सोबतच आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक देखील नेमण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने मात्र जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच हा गोळीबार नेमका का करण्यात आला याची देखील चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच, भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नयेत यासाठी पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार शहरात विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी
घटनास्थळी पोलिसांना एक चाकू देखील आढळून आला आहे. सोबतच गजानन याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले असून, परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येत आहे. तर, मयत गजानन याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. पोलिसांनी एका संशयिताला पकडल्याची देखील माहिती मिळत आहे.
पोलिसांनी एकाला पाठलाग करून पकडले...
गजानन तौरवर गोळीबार करणाऱ्या एकाला मौजपुरी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. मिथुन घुगे आणि पीएसआय राकेश नेटके यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून पकडले आहे. तर, ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीचे नाव लक्ष्मण गोरे असे असल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार करणाऱ्या तीन आरोपीपैकी एक जण मोटारसायकलवरून, तर दोन जण स्विफ्ट कारमधून फरार झाले होते. याची माहिती मिळताच मौजपूरी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मागून पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून आरोपीने स्वीफ्ट कार आणखी वेगाने पळवली. याचवेळी रामनगर कारखान्याजवळ रोडलगत असलेल्या एका खड्ड्यात गाडी आदळल्याने एक आरोपी पकडण्यात आला आहे. तर कारमधील दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
जालन्यात धनगर समाज पुन्हा आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग अडवून टायर पेटवले