Bhiwandi Crime : प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं, पोलिसांना म्हणाला...पत्नीची हत्या करुन आलोय, मृतदेह घरात आहे!
Bhiwandi Crime : पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना भिवंडीतील काल्हेर इथे घडली. या घटनेची माहिती त्याने नारपोली पोलीस ठाण्यात हजर राहून दिली.
भिवंडी : मुंबईजवळच्या भिवंडीमध्ये हत्येची घटना घडली आहे, ज्यात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या केली. या हत्यानंतर आरोपी पती पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. मी पत्नीचा गळा आवळून खून करुन आलो आहे, तिचा मृतदेह घरात पडला आहे, असं त्याने पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली. तर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरु केला आहे. मोहम्मद मुस्ताक हयातुल्ला शाह (वय 35 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या भंगार विक्रेत्याचे नाव आहे. तर आबिदा शाह (वय 32 वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोहम्मद मुस्ताक हयातुल्ला शाह हा भिवंडीच्या काल्हेर परिसरात पत्नी आणि पाच मुलांसह राहत होता. तो व्यवसायाने भंगारविक्रेता आहे. 15 वर्षांपूर्वी त्याचं आबिदा खातून शाह नावाच्या महिलेसह लग्न झालं होतं. पत्नीचे कोणासोबत तरी अवैध संबंध होते. मोहम्मदने पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देताना सांगितलं की, तो काल्हेर इथे वास्तव्यास असून रात्री जेवण करुन त्याच्या पत्नीसह सर्व कुटुंबीय झोपलेलं होतं. त्यानंतर उठल्यानंतर त्याला त्याची पत्नी अंथरुणावर दिसली नाही. त्यामुळे त्याने पत्नीचा शोध सुरु केला. त्यावेळी त्याला ती दुसऱ्या माळ्यावर दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली. त्यामुळे तिथेच असलेल्या वायरने त्याने तिचा गळा आवळून खून केला.
पत्नीची हत्या केल्यानंतर मोहम्मद मुस्ताक थेट नारपोली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती देऊन आत्मसमर्पण केलं. आरोपीला एकणू पाच अपत्ये आहेत. यात तीन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत.