Bhiwandi Firing : ठाण्याहून दुचाकीवरुन पाठलाग, भिवंडीत गोळीबार; सराईत गुन्हेगाराची भर रस्त्यात हत्या
Bhiwandi Firing : सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात फिल्मी स्टाईलने गोळीबार केल्याची घटना भिवंडीमध्ये घडली आहे. गोळीबारात गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. गणेश कोकाटे असं मृताचं नाव आहे.
Bhiwandi Firing : सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात फिल्मी स्टाईलने गोळीबार (Firing) केल्याची घटना भिवंडीमध्ये (Bhiwandi) घडली आहे. गोळीबारात गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. गणेश कोकाटे असं मृताचं नाव आहे. तर गणेश इंदुलकर असं आरोपीचं नाव असून त्याचा शोध सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे मृत गणेश कोकाटेने पाच महिन्यापूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं.
उपचारादरम्यान गणेश कोकाटेचा मृत्यू
ठाण्याहून भिवंडी मार्गे असलेल्या कशेळी गावाच्या हद्दीत बुधवारी (7 डिसेंबर) रात्री साडे ते आठच्या सुमारास हा प्रकार घडला. सराईत गुन्हेगार असलेला गणेश कोकाटे हा कारमधून जात असताना त्याच्यावर भर रस्त्यात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. ठाण्याहून दुचाकीवरुन दोन तरुण त्याचा पाठलाग करत होते आणि दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात गणेश कोकाटेच्या मानेला गंभीर दुखापत झाली. रहिवासी आणि घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी याची माहिती पोलिसाना दिली. कामगार पुरवण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं असून गणेश इंदुलकर नावाच्या आरोपीने ही हत्या केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. गोळीबारानंतर गंभीर जखमी अवस्थेत गणेश कोकाटेला ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जीवाला धोका असल्याचं गणेशने सांगूनही पोलिसांचं दुर्लक्ष : नातेवाईकांचा आरोप
विशेष बाब म्हणजे मृत गणेश कोकाटेने पाच महिन्यांपूर्वी नारपोली पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करुन आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. त्यातच दोन महिन्यांपूर्वी ठाण्यातील माजीवाडा परिसरात गणेश कोकाटेवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाला होता. मात्र त्यावेळी तो बालंबाल बचावला होता. यादरम्यान पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यावेळी मात्र गणेश इंदुलकर हा आरोपी फरार होता. आता झालेल्या गोळीबारात गणेश कोकाटेचा मृत्यू झाला आहे आणि या गुन्ह्यात गणेश इंदुलकर हा मुख्य आरोपी आहे. त्यामुळे पोलिसांनी मृत गणेशने जीवाला धोका असल्याच्या अर्जावर दुर्लक्ष केल्याचा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जर पोलिसांनी त्याच्या अर्जाचा वेळीच विचार करुन गांभीर्याने लक्ष दिलं असतं तर आज गणेश जिवंत असता, अशी प्रतिक्रिया त्याच्या नातेवाईकांनी दिली.
मृत गणेश कोकाटेवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
दरम्यान, मृत गणेश कोकाटेवर दरोडा, चोरी, तसंच गंभीर हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. गणेश भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता. नारपोली पोलीस स्टेशनमध्ये गोळीबाराच्या घटनेची नोंद करण्यात आली असून गोळीबार करणाऱ्या शूटरना पकडण्यासाठी भिवंडी ते ठाणे या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
VIDEO : Bhiwandi Firing : भिंवडीतील कशेळीत सराईत गुन्हेगारावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू