Bhiwandi Crime : मुंबईचा नगरसेवक असल्याचं सांगत भिवंडीतील बारवाल्यांकडून 8 लाख खंडणीची मागणी, असा सापडला भाजपचा नगरसेवक पोलिसांच्या जाळ्यात
Bhiwandi Crime : अकोले नगरपंचायतीचा नगरसेवक असलेल्या हितेश कुंभार याने मुंबई भाजपचा नगरसेवक असल्याचं सांगत भिवंडीतील बारचालकांकडून 8 लाखांची खंडणी मागितली होती.
ठाणे : नगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीचा भाजपचा नगरसेवक, पण भिवंडीत जाऊन मुंबईचा नगरसेवक असल्याचं सांगत बारचालकांकडून खंडणी मागितली आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हितेश कुंभार असं या भाजप नगरसेवकाचं नाव असून त्याने या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बार चालकांवर कारवाई करण्यासाठी पत्रही लिहिल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या एका डान्सबारमधून डान्सबार चालकांना धमकावून 8 लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून भाजप नगरसेवकाला रंगेहात अटक केली आहे. यावेळी या नगरसेवकाकडून 27 हजार रुपये देखील जप्त करण्यात आले आहे. हितेश कुंभार असं या भाजप नगरसेवकाचं नाव असून तो अकोले नगरपंचायतचा नगरसेवक आहे. त्याच्यासोबत त्याचे साथीदार देवेंद्र खुटेकर आणि राकेश कुंभकर्ण यांनाही अटक करण्यात आली आहे.
मुंबई नाशिक महामार्गालागत कोनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिवंडी बायपास येथे अनेक डान्स बार आहेत. त्यापैकी लैला डान्सबार हा चालक संतोष भोईर आणि हरीश हेगडे पार्टनरशिपमध्ये चालवतात. या डान्स बारमध्ये येऊन हितेश कुंभार याने खंडणी मागितली. मी मुंबईचा भाजपचा नगरसेवक आहे, तुमचे बार चालवायचे असेल तर आर्केस्ट्रा बारचे 5 लाख रुपये आणि सर्विस बारचे 3 लाख रुपये असे एकूण 8 लाख रुपयांची मागणी केली.
महिना 25 हजारांची मागणी
दरम्यान या व्यतिरिक्त 25 हजार रुपये महिन्याला हप्ता द्यावा लागेल अशी डान्सबार चालकाकडे मागणी केली. त्यावेळी बार चालकाने सांगितले की मी इतर डान्स बार चालकांना विचारून सांगतो. त्यानंतर हितेश कुंभार यांनी बारचालकाकडे गुडलक स्वरूपात पैशाची डिमांड केली. त्यावेळी बार चालकांनी हितेश कुंभार यांना सांगितले की तुम्ही उद्या, या त्यावेळी सर्वांशी चर्चा करून गुडलक देऊ असं सांगितल्यानंतर हितेश कुंभार आपल्या साथीदारांसह निघून गेले.
आठ लाखांच्या खंडणीची मागणी
त्यानंतर दुसऱ्या दिवशी हितेश कुंभार पुन्हा लैला बारवरती आपल्या साथीदारांसह आले आणि खंडणीची मागणी केली. त्यावेळी 9 बार चालकांनी प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे एकूण 27 हजार रुपये जमा केले होते आणि हितेश कुंभार यांना सांगितले की 27 हजार रुपये गुडलक म्हणून घ्या. परंतु हितेश कुंभार यांनी वन टाइम रकमेबद्दल चर्चा केली आणि ती रक्कम आठ लाख रुपये होती. त्यावेळी बार चालकांनी सांगितले की ही रक्कम फार मोठी आहे, हे देणं शक्य होणार नाही. आम्हाला थोडा वेळ पाहिजे. त्यावर जर तुम्ही वन टाइमचे पैसे दिले नाही तर तुम्ही डान्सबार कसे चालवता हे मी पाहतो अशी धमकी हितेस कुंभार याने दिली.
त्यावेळी बार चालकांनी सांगितले की ही रक्कम फार मोठी आहे त्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवा असल्याचे सांगत बार चालक संतोष भोईर यांनी बारच्या बाहेर येऊन थेट कोनगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेली सर्व हकिकत पोलिसांसमोर मांडली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनाचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि पोलीस देखील लैला डान्सबार येथे दाखल झाले. त्यानंतर मुंबईचे भाजप नगरसेवक असल्याचे सांगणारे हितेश कुंभार यांनी आपल्या साथीदारांसह वन टाइम रकमेची डिमांड केली.
पोलिसांनी रंगेहात पकडलं
गुड लकचे 27 हजार रुपये लैला डान्स बार चालकांकडून स्वीकारत असताना पोलिसांनी भाजपा नगरसेवक हितेश कुंभार यांच्यासह त्याच्या दोन साथीदारांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणांमध्ये कोनगाव पोलिसांनी कलम 384 ,386, 506 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत असून कॅमेरे समोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
बारवर कारवाई करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना पत्र
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हितेश कुंभार यांच्याबद्दल चौकशी केली असता हितेश कुंभार हे मुंबईचे नगरसेवक नसून नगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायत येथील प्रभाग क्रमांक 4 मधील भाजपचे नगरसेवक असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर भाजप नगरसेवक हितेश कुंभार यांनी 1 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरात नियमांची पायमल्ली करणाऱ्या डान्सबार वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करता त्यांनी एक पत्र लिहिले होते. तसेच या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे.
हितेश कुंभार पोलीस महासंचालक यांच्याकडेही तक्रार केली आहे. परंतु दुसरीकडे याच डान्स बार चालकांकडून मोठी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न देखील भाजपा नगरसेवक हितेश कुंभार यांच्याकडून केला जात होता. भिवंडीतील डान्सबार चालकांकडून एकूण आठ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ज्यामध्ये गुडलक म्हणून 27 हजार रुपये घेताना कोनगाव पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कोनगाव पोलीस करीत आहेत.
ही बातमी वाचा: